उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊन सरकार स्थापन करणार आहेत. फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री म्हणून घोषणा देखील केली होती. काही वेळापूर्वी त्यांचा शपथविधी देखील झाला आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री पदी पंकजा मुंडे यांच्या नावाची वर्णी लागणार आणि राज्याला आणखी एक सरप्राईज मिळणार अशी चर्चा सुरू होती. शिवाय या रेसमध्ये भाजपचे जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांची देखील नावं चर्चेत होती.
विधानपरिषद निवडणुकीत तिकीट डावलले होते, त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे यांचे नाव उपमुख्यमंत्री पदासाठी आवश्यक जाणार अशी सगळीकडे चर्चा होऊ लागली होती. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांनी नव्या सरकारच्या मंत्रीमंडळात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंडेंचा मार्ग उपमुख्यमंत्री पदासाठी खुला होता.
ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी करून एक सरप्राईज दिलं होतं, त्याप्रमाणे आता उपमुख्यमंत्र्याच्या पदावर पंकजा मुंडेंचं नाव घोषित करतील, आणि राज्याला आणखी एक सरप्राईज देतील अशी चर्चा सर्वत्र होती.
मात्र, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, फडणवीसांनीच उपमुख्यमंत्री व्हावं असे आदेश भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून आला आणि ही रेस आणखी रंजक झाली. रेसमधील बाकीचे नावं थेट गायबच झाली आहेत. नुकतीच देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. यामुळे सर्वांनाच हे चकीत करणारं ठरलं.
फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यामुळे इतरांची संधी हुकली आहे. फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचं मन दुखावलं गेलं असू शकतं अशी चर्चा सध्या सुरू आहे. पुढे पंकजा मुंडे समर्थक काय प्रतिक्रिया देतील पाहावं लागेल.