काल उद्धव ठाकरेंनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र त्याआधी त्यांनी मंत्रिमंडळ बैठक घेऊन औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या निर्णयानंतर विविध स्तरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
या दोन शहरांचे नामकरण करण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल मंजूर झाला. त्यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपली प्रतिक्रिया देत शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘जो बूँद से गयी वो हौद से नही आती’ असे म्हणत मनसेनी टीका केली आहे.
संभाजीनगर नामांतरावरून मनसेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी आपलं मत व्यक्त केलं. म्हणाले, महाविकास आघाडी सरकारचे कपडे उतरले आहेत, आता लंगोट वाचवायचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, आजपर्यंत अडीच वर्षात झालेल्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचे संभाजीनगर करा हा प्रस्ताव का ठेवला गेला नाही? असे खांबेकर म्हणाले.
तसेच म्हणाले, शिवसेनेला हे माहीत आहे की, आता आपण सत्ता गमावलेली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील जनता देखील शिवसेनेच्या विरोधात आहे, त्यामुळे किमान काही तरी केल्याचा हा प्रयत्न आहे. मनसेकडून देण्यात येणाऱ्या या प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधत आहेत.
दरम्यान, औरंगाबादच्या नामांतरावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या फोटोवर चपलाचा हार घातला पाहिजे. राजकारणासाठी हे नेते अतिशय खालच्या पातळीवर आले.
राष्ट्रवादी, काँग्रेसचे दलाल नेते रस्त्यावर फिरताना दिसले तर त्यांच्या अंगावर थुंका, सत्तेचा एवढाच मोह होता तर सत्तेला चिटकून बसायला हवं होतं. हा निर्णय घेतला जात होता, तेव्हा राहूल गांधी, शरद पवार, सोनिया गांधी आणि अशोक चव्हाण तोंडात लाडू घालून बसले होते का असा संतप्त सवाल देखील जलील यांनी केला.