राज्यपालांनी ‘मविआ’ला चहुबाजूंनी घेरलं! बहुमत चाचणीसाठी घातल्या ‘या’ कठोर अटी

महाराष्ट्र राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी आदेश दिले आहेत. तसेच अधिवेशनात आमदारांची मोजणी करण्याची सूचना देखील राज्यपालांनी यावेळी उद्धव ठाकरे यांना दिली आहे.

काल म्हणजेच मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या प्रमुख नेत्यांनी राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये, महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असून लवकरात लवकर बहुमत चाचणी घ्यावी अशी मागणी भाजपने केली. भाजपने केलेल्या मागणीनंतर राज्यपालांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे.

त्यानुसार आता उद्धव ठाकरे सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. गुरुवारी पाच वाजेपर्यंत हे बहुमत सिद्ध करण्याची राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना सूचना दिली आहे. तसेच राज्यपालांनी ठाकरे सरकारला अधिवेशनासाठी काही नियम देखील घालून दिले आहेत.

विधानभवन अधिवेशनात आमदार आल्यानंतर एकूण किती आमदार उपस्थित आहे याची शिरगणना करावी, सभागृहात किती आमदार उपस्थित आहे, याची नोंद करावी असे राज्यपालांनी सांगितले आहे. तसेच आवाजी मतदान घेऊ नाही, सभागृह बरखास्त करू नाही अशी सूचना राज्यपालांनी केली.

राज्यपालांनी ठाकरे सरकारला दिलेल्या या सुचनेमुळे आता उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना आवाजी मतदान घेता येणार नाही. त्याचबरोबर सभागृह देखील बरखास्त करता येणार नाही. विशेष म्हणजे अधिवेशनाचे लाईव्ह ब्रॉडकॉस्ट केले जाणार आहे. त्यामुळे आता राज्यपालांनी हे नियम घालून मोठी खेळी केली अशी चर्चा सुरू आहे.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी काल म्हणजेच मंगळवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतली. फडणवीस यांनी नड्डा यांना शिवसेनेतील बंडखोरी, एकनाथ शिंदेंसोबतची आमदारांची संख्या आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि भविष्याबाबत माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमित शहा आणि फडणवीस यांच्यात महाराष्ट्रातील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर सर्व पैलू आणि सरकार स्थापनेच्या सूत्राबाबत चर्चा झाली. या संपूर्ण घटनाक्रमात सावधपणे पावले उचलणाऱ्या भाजपला एकनाथ शिंदे यांच्या शेवटच्या चालीची प्रतीक्षा असल्याचे बोलले जात आहे.