स्वाभिमान गहाण ठेवला नाही नसून मुठभर मावळ्यांसोबत राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे करणार;अरविंद सावंत यांनी केला विश्वास व्यक्त 

‘ राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधान सभेच्या बरखास्तीकडे सुरु आहे’, असे ट्वीट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनीही राजकीय घडामोडींवर भाष्य केले आहे. “आम्ही स्वाभिमान गहाण ठेवला नाही.मुठभर मावळे घेऊन राखेतून अस्तित्व घेऊन पुन्हा उभे राहणार”, असा  विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “सध्या ठाकरे सरकार कोसळणार की नाही हे मी सांगू शकत नाही. आम्ही कधीच सत्तेची काळजी केली नाही. आम्ही कधीच शरणार्थी म्हणून जगलो नसून स्वाभिमानाने जगलो” असे सावंत म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले, “माध्यमं राजकीय भूकंप असे शब्द राज ठाकरे, नारायण राणे गेल्यापासून वापरत आहेत.परंतु शिवसेना पुन्हा उभी राहील”, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडणार असून पुढची दिशा ठरवली जाणार आहे.

शिवसेना हा पक्ष आमदारांमुळे नाही तर शिवसैनिकांमुळे आहे. त्यामुळे विधानसभा बरखास्त होणार का नाही, याबाबत चर्चा केली जाणार आहे.त्याचबरोबर आलेल्या परिस्थितीला सामोरे कसे जायचे यावरही चर्चा होणार आहे.त्यामुळे या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

पक्षात मतभेत असावेत परंतु मनभेद नसावेत. आज जर आनंद दिघे असते तर त्यांना हे मान्य असते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर बंडखोर आमदारांनी तिकडे जाऊन शिवसैनिक आणि जनतेची प्रतारणा केल्याचा आरोप सावंत यांनी केलेला  आहे.

पक्षात राहून पदाचा वापर करून केवळ एकाच दिवसात प्लॅन तयार केला.त्यांना विमानाच्या तिकिटाचे पैसे कोण देत आहे?हॉटेलचे पैसे कोण देत आहे? आता ईडी झोपली आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत सगळे चित्र स्पष्ट होईल, असेही सावंत म्हणले आहेत.