Share

काल रात्री आदित्य ठाकरेंसोबत फिरणारा शिवसेनेचा ‘तो’ माजी मंत्रीही शिंदेना सामील; गुवाहाटीला रवाना

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला खिंडार पडले आहे.अकरा जिल्ह्यातील सर्व आमदार शिंदेंकडे असल्याने ठाकरे सरकारला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनीही बंड केल्यामुळे ठाकरे सरकारला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.

काल रात्रीपर्यंत संजय राठोड हे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबत होते. कोणत्याही परिस्थितीत मी मातोश्री सोडणार नाही, अशी त्यांची भूमिका होती. परंतु आज एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ संजय राठोड हे गुवाहटीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

संजय राठोड यांच्याकडे एकेकाळी वनमंत्री पद होते. परंतु पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी त्यांना मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर त्यांनी राजकारणात पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यांच्या या निर्णयातून त्यांची ठाकरे सरकारवरील नाराजी स्पष्ट दिसत आहे.

11 आमदारांपासून सुरु झालेले हे बंड आता तब्बल 46 आमदारांवर पोहोचले आहे. संध्याकाळपर्यंत बंडखोरांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राजकारणाने एक वेगळेच वळण घेतले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे सरकार पडणार की काय?असा सवाल सगळ्यांनाच पडला आहे.

उद्धव ठाकरे यांनी कालच एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मी पक्षाविरोधात अजूनही कोणताच निर्णय घेतला नाही, तरीही मला गटनेतेपदावरून काढून टाकले. संजय राऊत माझ्यासोबत फोनवर चांगले बोलतात. परंतु ते प्रसारमाध्यमांमध्ये माझ्यावर टीका करतात. लवकरच मी माझा निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच संजय राऊत यांनी ठाकरे सरकारबाबत एक सूचक ट्वीट केले आहे.’राज्यातील राजकीय घडामोडींचा प्रवास विधानसभेच्या बरखास्तीकडे सुरु आहे’, असे राऊत ट्वीटमधुन म्हणाले आहेत. त्यांच्या या ट्वीटमुळे ठाकरे सरकार पडणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

ताज्या बातम्या राजकारण

Join WhatsApp

Join Now