Share

ठाकरे सरकार कोसळणार? एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन सुरतहून गुवाहाटीमध्ये दाखल

एकनाथ शिंदे यांच्यासह सेनेचे बंडखोर आमदार सुरत शहरातील ले मेरेडियन हॉटेलमध्ये मुक्कामी होते. मात्र, आता ते बंड फसू नये, यासाठी गुजरातहून आसामला रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे. स्पाईसजेच्या तीन विमानांनी त्यांना गुवाहाटीला नेण्यात आलं आहे.

विधानपरिषद निवडणूकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांनी थेट सुरत गाठलं. ते सूरत येथील मेरिडियन हॉटेलमध्ये होते. याठिकाणी त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास १३ आमदार उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांची तिथे भाजपसोबत वाटाघाटी सुरू होती.

त्यानंतर शिवसेनेने आपल्या हालचाली वाढवल्या आणि इतर आमदारांना सुरत येथे जाण्यापासून रोखले. त्यातच दुसरीकडे एकनाथ शिंदे आमदारांसह गुजरातहून आसामला दाखल झाले असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे, बंडखोर आमदार, त्यांचे पीए असे एकूण ६५ जण असल्याची माहिती आहे.

माहितीनुसार, या सर्वांना तीन बसने विमानतळावर नेण्यात आले. तिथे तीन विमानं सज्ज होती. या विमानांनी सर्व जण आसामला दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत ३५ हून अधिक आमदारांचं समर्थन असल्याचा दावा केला आहे.

शिवसेनेच्या हालचाली पाहता तसेच शिंदेंनी पळवून नेलेले आमदार हातावर तुरी देऊन त्यांच्या ताब्यातून निसटणार अशी माहिती मिळाल्याने शिंदे यांनी देखील मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आमदारांना नेण्याचा घाट घातला. त्यामुळेच सुरतेहून थेट आसाम असा प्रवास ठरवला असावा असे बोलले जात आहे.

दरम्यान, खासदार संजय राऊत यांनी इशारा दिला आहे की, जे शिवसेना आमदार आज इथे नाहीयेत, त्यांनी जर नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांची आमदारकी रद्द होईल, त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरं जावं लागेल, त्यांची राजकीय कारकीर्द संपेल.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या अनेक आमदारांना सोबत नेत बंड पुकारलं आहे. त्यानंतर शिंदेंसह सर्व आमदारांना परतण्याची ताकीद संजय राऊत यांनी केली. त्यामुळे आता कुठेतरी आमदार निसटून बंड फसू नये, यासाठी मुंबईपासून जवळपास २७०० किमी दूर आमदारांना नेण्याचा घाट शिंदेंनी घातला आणि त्या सर्वांना आसामला नेलं.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now