बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आर. माधवनचा बहुप्रतिक्षित ‘ राॅकेट्री : द नंबी इफेक्टस ‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात माधवन मुख्य भूमिका साकारणार असून दिग्दर्शन आणि लेखनही त्यानेच केले आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या भाषेतही हा चित्रपट पाहायला मिळणार आहे.
इस्त्रोचे माजी अध्यक्ष आणि राॅकेट सायंटिस्ट नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित राॅकेट्री हा चित्रपट आहे. आर. माधवन याने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. नंबी यांच्यावर देशद्रोहाचा आरोप झालेला होता. तो त्यांनी कसा खोटा ठरवला, हे या चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर जगप्रसिद्ध कान्स या महोत्सवात रिलीज झाला आहे. त्याचबरोबर टाईम्स स्क्वेअरवरही या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला होता. या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसादही मिळत आहे. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत होते. 1 जुलैला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सज्ज झाला आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याने एकही रुपया न घेता काम केले आहे. त्यामुळे त्याच्यावर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. आर.माधवन सध्या या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून त्याने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत शाहरुखच्या विनामुल्य काम करण्याचे कारण सांगितलेआहे.
‘ शाहरुख खान हा झिरो चित्रपटाचे शुटींग करत असताना त्याला राॅकेट्री या चित्रपटासाठी विचारले होते. चित्रपटाची कथा ऐकताच शाहरुखने चित्रपटात विनामुल्य काम करण्याची तयारी दर्शवली’, असे माधवनने मुलाखतीदरम्यान सांगितले. त्यामुळे या चित्रपटात शाहरुखने कोणतीही रक्कम न घेण्याचे कारण स्पष्ट झाले आहे.
या चित्रपटाचे शुटींग करत असताना आर. माधवनला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला आहे. या चित्रपटात आर. माधवन हा मुख्य भूमिकेत असून शाहरुख खान यांच्यासोबतच टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता सूर्या हा दिसणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवली आहे.






