Share

विधान परिषदेच्या तोंडावर रवी राणांना झटका; अमरावती पोलिसांकडून अटक वॉरंट जारी

विधान परिषद निवडणूक जवळ आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच दुसरीकडे हनुमान चालिसा प्रकरणी चर्चेत आलेले अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. रवी राणा यांच्या विरोधात अमरावती पोलिसांनी जमीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे.

रवी राणा यांच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या आयुक्तांवर शाई फेकल्याप्रकरणी हे अटक वॉरंट काढण्यात आले. माहितीनुसार, काल संध्याकाळी पाच ते सहा पोलिसांचे एक पथक रवी राणांच्या मुंबईतील घरी पोहोचले होते. दरम्यान आमदार रवी राणांच्या घरी कोणी नव्हते.

त्यामुळे हे वॉरंट कोणीही स्वीकारले नाही अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान राज्यात विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी फक्त एक दिवस उरलेला असल्याने आमदार रवी राणांविरोधात अटक वॉरंट जारी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान, रवी राणा यांनी फेसबुकवर याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. म्हणाले, अमरावतीच्या पोलीस आयुक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणात अमरावती येथून पोलीस माझ्या मुंबईतील खार येथील घरी पाठवले. मुंबई पोलीसही आले.

त्याठिकाणी मी नसल्याने मला ते अटक करु शकले नाही, भाजपला मी मतदान करु नये या उद्देशाने महाविकास आघाडीचा दबाव, मुख्यमंत्र्यांचा दबाव याला मी कायदेशीर उत्तर देणार आहे. भाजपचे उमेदवार निवडून येतील यासाठी पूर्ण ताकद लावेन. या दबावाला मी बळी पडणार नाही, असे रवी राणा म्हणाले.

फेब्रुवारी २०२२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हटवण्यात आल्याने संतप्त झालेल्या रवी राणा समर्थकांनी महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाईफेकून निषेध नोंदवला होता. अमरावती पोलिसांनी त्याच्याविरुद्ध कलम ३०७ आणि ३५३अंतर्गत गुन्हे दाखल केले होते.

राज्य राजकारण

Join WhatsApp

Join Now