राज्यात विधान परिषद निवडणूक दोन दिवसांच्या अंतरावर आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात सध्या अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. अशातच काँग्रेस नेते नाना पटोले यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात त्याचीच चर्चा सुरू आहे.
विधान परिषद निवडणुक २० जून रोजी होणार आहे. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. नाना पटोले यांनी भाजपवर आरोप केला आहे की, भाजप विरोधी पक्षांना त्रास देण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे. विधान परिषद निवडणुकीतही या यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकत आहे .
नाना पटोले म्हणाले, भाजप सरकार सीबीआय आणि ईडीचा हत्यार म्हणून वापर करत असून, हे लोकशाहीसाठी घातक आहे. सत्तेसाठी भाजपने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. आघाडीत बिघाडी झाल्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत, पण बिघाडी आघाडीत नाही तर भाजपमध्ये दिसत आहे.
विधान परिषद निवडणुकीत भाजपकडून अडथळे निर्माण केले जात आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन केले जात आहेत, याची सर्व माहिती आमच्याकडे असून, वेळ आली की ही माहिती समोर आणू, असे नाना पटोले म्हणाले.
तसेच म्हणाले, काँग्रेसला दुसऱ्या जागेसाठी १२ मतांची आवश्यकता आहे तर भाजपला पाचव्या उमेदवारासाठी २२ मते लागतात. तरीही पैसा व केंद्रीय तपास यंत्रणांच्या भरवश्यावर भाजप विजयाचा दावा करत आहे. तो यावेळी चालणार नाही. यावेळी, आकड्यांचे गणित हे महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.
अग्निपथ योजना याबद्दल बोलताना नाना पटोले म्हणाले, सैन्य दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली अग्निपथ योजनेला देशभरातून तरुण तीव्र विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत. अशा प्रकारच्या सैन्य भरतीमुळे तरुणांचे भवितव्य उद्ध्वस्त होणार आहे. केंद्र सरकारने लादलेली अग्निपथ योजना मागे घेण्यास आम्ही सरकारला भाग पाडू असा विश्वास नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.