जावई म्हटलं की त्याला त्याच्या सासरवाडीत मिळणारा मानपान वेगळाच असतो. सासरवाडीत आल्यावर जावयाचा वेगळाच थाट असतो. अशातच जावयाचा थाट पूर्ण न केल्याने सासूने चक्क सुनेच्या डोक्यात पकड मारल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये सून गंभीर जखमी झाली आहे.
ही धक्कादायक घटना औरंगाबाद जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यात घडली आहे. जावई सासरवाडीत गेल्यानंतर सुनेनं त्याला पुरणपोळी बनवली नाही म्हणून संतापलेल्या सासूने सुनेच्या डोक्यात पकडीने वार केला. या घटनेत सून गंभीर जखमी झाली आहे. संबंधित जावयाची खुलताबाद तालुक्यातील बाजारसावंगी गावात सासरवाडी आहे.
माहितीनुसार, काही कामानिमित्त जावई म्हणणार व्यक्ती सासरवाडीत गेला होता. बऱ्याच दिवसांनी जावई घरी आल्यानंतर सासूलाही आनंद झाला. जावयाला खुश करण्यासाठी तिने आपल्या सुनेला जावयासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यास सांगितला.
मात्र, सूनेनं पुरणपोळी बनवून देण्यास नकार दिला. सूनेनं नकार दिल्याने सासूला राग अनावर झाला. सासू रागात किचनमध्ये गेली, आणि सुनेच्या डोक्यात पकडीने वार केले. या घटनेत सून गंभीर जखमी झाली. त्यानंतर जखमी सुनेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तिच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र डोक्यात वार केल्यामुळे प्रकृती गंभीर असल्याचं देखील बोलले जात आहे. याप्रकरणी, सासूवर खुलताबाद पोलिंसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेचा पुढचा तपास पोलीस करत आहेत. मात्र सासूने केलेल्या कृत्यामुळे परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झालं आहे.
सध्या कोणत्याही गोष्टीत संयम सुटला की रागाच्या भरात व्यक्ती काय करेल हे सांगता येत नाही. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव त्याच्या हातातून वेगवेगळा अपराध घडवून आणतो. क्षणभर आलेल्या रागामुळे भविष्याचा विचार न करता लोक क्राईमच्या दिशेने पाऊल टाकतात आणि स्वतः चे आयुष्य बरबाद करतात. त्यामुळे हे सगळं टाळण्यासाठी संयम ठेवणं आवश्यक आहे.