आज महाराष्ट्र बोर्डचा दहावीचा निकाल जाहीर झाला. ज्या मुलांना चांगले गुण मिळाले त्यांनी जल्लोष साजरा केला. जे नापास झाले ते निराश झाले. पण, आता पुण्यातील एका विद्यार्थ्याचा वेगळाच निकाल लागला आहे. ज्याची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. प्रत्येक विषयात त्याला ३५ गुण मिळाले आहेत.
प्रत्येक विषयात ३५ गुण मिळणार हा मुलगा पुण्यातील गुरुवार पेठ येथील लोहियानगर येथे राहणारा आहे. त्याचं नाव शुभम जाधव आहे. तो पुण्यातील न्यू इंग्लिश रमणबाग येथे शिकत होता. शुभमला जेव्हा सगळ्याच विषयात ३५ गुण मिळाले, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
माहितीनुसार, शुभम गेल्या दोन वर्षांपासून शाळेबरोबरच काम करत आहे. आई वडिलांना कामात मदत करत आहे. घराची परिस्थिती त्याची हलाखीची आहे. तो अभ्यास तर करत होता, पण कामामुळे त्याचा अभ्यास कमी झाला आणि त्याला कमी मार्क पडले.
शुभमचे वडील पाण्याच्या टाकीचं काम करतात. तर आई धुणी भांडी करण्याचं काम करते, आणि शुभम शाळा शिकता शिकता हार्डवेअरच्या दुकानात कामाला जात होता. निकाल लागल्यानंतर शुभम निराश झाला होता, त्याला वाटले त्याला जास्त मार्क मिळतील मात्र तो काठावर पास झाला.
कोणालाही वाटला नाही असा अनपेक्षित निकाल लागला, त्यामुळे सर्वांना आश्चर्य वाटले. निकालानंतर शुभमला विचारले असता तो म्हणाला, मी पुढे अभ्यास करेल आणि चांगले मार्क्स पाडेल. तसेच त्याला पोलीस व्हायचे असल्याचं देखील त्याने सांगितले. मात्र, त्याला मिळालेल्या मार्क्समुळे सर्वांना आश्चर्य वाटले आहे.
महाराष्ट्र बोर्डच्या आजच्या या निकालात राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी ६,५०,७७९ विद्यार्थ्यांना ७५ टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ५,७०,०२७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आहेत. तर राज्यातील २९ शाळांमध्ये एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. इतरही शाळांमध्ये काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.