Share

वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पंढरपूर यात्रेनिमित्त अनिल परबांची मोठी घोषणा

कोरोनाच्या दोन वर्षांच्या काळात आषाढी एकादशीच्या सोहळ्याला प्रतिबंध लावण्यात आला होता. या दोन वर्षांच्या काळानंतर आता आषाढी एकादशीचा सोहळा या वर्षी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे, कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर यावर्षी तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूर येथे आषाढी एकादशीचा सोहळा रंगणार असून, वारकऱ्यांना पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळ देखील लज्ज झाले आहे.

एकादशीसाठी एसटी महामंडळाकडून श्रीक्षेत्र पंढरपूर यात्रेसाठी ४ हजार ७०० विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. तसेच त्यांनी माहिती दिली की, सहा जुलै ते १४ जुलै दरम्यान या विशेष गाड्या सोडल्या जाणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी २०० बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माहितीनुसार, एकादशी सोहळ्यासाठी औरंगाबाद विभागातून १ हजार २००, मुंबई ५००, नागपूर १०० तर, पुणे विभागातून १२००आणि नाशिक विभागातून १ हजार,अमरावती येथून ७०० बसेस सोडल्या जाणार असल्याचे परब यावेळी म्हणाले. त्यामुळे सर्व वारकरी सांप्रदायाने राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.

माहितीनुसार, दिंडीकऱ्यांच्या मागणीनुसार संस्थानच्या सही शिक्क्याने दिंडीकऱ्यांना वाहन पास दिले जाणार आहे. यंदाच्या आषाढी एकादशीच्या पायी वारीसाठी २१ जूनला आळंदीतून पंढरीकडे माऊलींची पालखी प्रस्थान करणार आहे. तिथीची वृद्धी झाल्याने लोणंदमध्ये अडीच दिवस; तर पुणे, सासवड व फलटणमध्ये प्रत्येकी दोन दिवस सोहळा मुक्कामी असणार आहे.

या वर्षीच्या पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे. आषाढी एकादशी बद्दल अधिक माहीती म्हणजे सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात धार्मिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचा मानण्यात येतो. या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकाद्शीला पायी चालत येतात. हिलाच आषाढी वारी म्हणतात.

राज्य इतर

Join WhatsApp

Join Now