…यामुळे महाविकास आघाडीचा गेम बिघडला, बच्चू कडूंनी सांगितले खरे कारण

राज्यसभा निवडणुकीत एका जागेवर झालेल्या पराभवावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना अपक्ष आमदारांवर खापर फोडले. या पार्श्वभूमीवर आता राज्यमंत्री बच्चू कडू यांनी राऊतांच्या वक्तव्याचा विरोध केला असून, महाविकास आघाडीचा गेम बिघडण्याचं कारण सांगितलं आहे.

बच्चू कडू म्हणाले, रिस्क नको म्हणून आपापल्या उमेदवाराला जास्त मतं राखून ठेवण्याच्या नादात महाविकास आघाडीचा गेम बिघडला. आता संजय राऊत अपक्षांवर खापर फोडत आहेत. अपक्षांना बदनाम करून चालणार नाही, कारण काही अपक्ष सोबतही होते.

तसेच म्हणाले, अमरावती जिल्ह्यातील एक अपक्ष आमदार जो आघाडीसोबत आहे तो देखील या घोडेबाजारात सहभागी आहे, असा गंभीर आरोप राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला. घोडेबाजार किंवा इतर कुठला दबाव जसं ईडी किंवा सीबीआयमुळं अपक्षांवर दबाव असू शकतो, असं म्हणत कुणालाही जबाबदार ठरवण्यापेक्षा प्रत्येकाने समजून घेण्याचा हा भाग आहे, असेही बच्चू कडू म्हणाले.

पक्षांनी थोडी रिस्क घेतली असती तर चित्र वेगळं असतं, हे चित्र कायम राहिल असं नाही, विधान परिषेदेत चित्र बदलू शकते, सरकारवर काही परिणाम होणार नाही. एकंदरीत आठ ते नऊ मत कमी पडली, संजय राऊतांना ४१ मतांवर ठेऊन शिवसेनेने रिस्क घेतली, मात्र इतर पक्षाने तसं केलं नाही.

इतर पक्षांनी रिस्क घेतली त्यामुळे निकाल त्यांच्या बाजूने लागला. ज्या आमदाराचं सभासदत्व कायम आहे. पण त्यांना मतदान अधिकार नाही, हा कोर्टाचा निकाल अनाकलनीय असल्याचे देखील बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. समुद्राची खोली मोजता येईल मात्र शरद पवारांच्या मनात काय आहे, हे मोजता येत नाही असेही यावेळी ते म्हणाले.

दरम्यान संजय राऊत म्हणाले होते की, चार किंवा पाच मतांचा थोडा फरक झालेला आहे. हे आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले लोक तिकडे गेले नाहीत. काही अपक्ष आहेत, काही अमित शहा आहेत, काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा आहेत. काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहेत. ठीक आहे ती आज जिंकली उद्या पाहू, हे निवडणुकीत होतच असतं.