दुचाकीवरील ताबा सुटल्याने सांगलीतील जत तालुक्यात एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांना प्राण गमवावा लागला असुन एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातात झालेल्या तिघांच्या मृत्युमळे संपुर्ण गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
या अपघातात अजित भोसले ( वय- २२ वर्षे ), राजेंद्र भाले ( वय- २२ वर्षे), मोहित तोरवे ( वय – २१ वर्षे) यांचा जागीच मृत्यु झाला असुन संग्राम तोरणे ( वय – १६ वर्षे) गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास झाला. हे चारही तरुण एकाच दुचाकीवर जतहून कोसारीकडे येत होते. त्यावेळी विजयपुर – गुहागर राष्ट्रीय महामार्गावरील बिरनाळ ओढ्याजवळ हा अपघात झाला.
दरम्यान, हे चारही मित्र कोसारी गावामधील असुन ते शनिवारी रात्री जतहुन आपल्या गावी येत होते. तेव्हा बिरनाळजवळ असणा-या ओढा पात्रानजीक धोकादायक वळणावर दुचाकीवरील ताबा सुटला आणि अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, यामध्ये दुचाकी चालवत असलेल्या अजितचा जागीच मृत्यु झाला.
या अपघाताची स्थानिकांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची भीषणता लक्षात घेता त्यांनी जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु, गंभीर जखमी झाल्याने मोहित आणि राजेंद्रचा उपचारापुर्वी मृत्यु झाला. तर संग्रामवर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू झाल्याने संपुर्ण गावावर शोककळा पसरली असुन सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर घटनास्थळी लोकांनी खुप गर्दी केली होती. आज पहाटे अतिशय शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला.
रात्रीच्या वेळी एकाच दुचाकीवरून चौघाजणांनी प्रवास केला. त्यामुळे तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. मन हेलावून टाकणारी अशी ही घटना घडली आहे. याप्रकरणी अधिक तपास सांगली पोलीस करत आहेत.