‘भाट’ हा एक भटका समाज असून ‘भाट’ किंवा ‘पुस्तके’ या नावानं तो महाराष्ट्रभर ओळखला जातो. या भाटांचा पिढीजात व्यवसाय म्हणजे, पूर्वजांच्या किंवा आपल्या मालकाच्या वंशावळी, त्या संदर्भातील इतर नोंदी लेखी स्वरूपात ठेवणे होय. भाटांमध्ये देखील जातीचे विभाजन आढळून येते.
भाटांकडे, आपले पूर्वज कोण होते? त्यांचे मूळ गाव, त्यांचं नाव, जात-पोटजात, पूर्वज कोठे राहत होते? अगदी खापर पणजोबा काय करायचे, तुमचे कुटुंब मुळचे कुठले? परिवार या गावात कसा आला? तुमचे कुलदैवत कोणते? या सगळ्याविषयीचा इतिहास सापडतो.
त्यांच्याकडे याविषयी एवढी सविस्तर माहिती असते की, शासनाच्या कोतवाल बुकातही आपल्याला अशी रंजक माहिती सापडणार नाही. माहितीनुसार, भाट लोक अडीच वर्षातुन एकदा एखादा गावात एक- दोन महिने वास्तव करण्यासाठी जातात. मग ते गावातील घर अन् घर पिंजुन काढतात.
भाट जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा ते वंशावळ वाचण्याच्याआधी श्रीगणेश व इतर देवतांना वंदन करून वाचायला सुरुवात करतात. नंतर ते एका विशिष्ट सुराता आपल्या खाबरपंजोबा,पंजोबा, आजोबा या वंशावळीची नावे वाचून दाखवतात.
त्यानंतर ते घरातील जेष्ठ मंडळींना विचारपुस करतात घरात नविन सुन लग्न करुन आली का? तुमच्या घरात लहान मुलं जन्माला आले का? जर आले तर तर नवीन पिढीतील सुनांची त्यांच्या मुलांची नावे याची नोंद करुन घेतात. ही नोंद करायचे ते वेगवेगळ्या स्वरूपात मोबदला घेतात.
कुणी त्यांना धातुची भांडे देतात तर कुणी धान्य देतात. सोबत काही दिलदार लोक पैसेही देतात. जुण्या भाटांच्या दप्तरात ‘सांकेतिक’ लिपीत लिहिलेला बहुतेकांचा लेखाजोखा आजही उपलब्ध आहे. त्यांचा हा पारंपरिक व्यवसाय इतर कुणीही करू नये, म्हणून सांकेतिक लिपीत नोंदी करण्याची त्यांची पध्दत असावी असा अंदाज बांधला जातो.






