गुजरातमधील पाटीदार समाजाच्या आंदोलनाचा चेहरा असणाऱ्या हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. त्यानंतर त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबद्दल सगळ्यांना प्रश्न पडला होता. त्यांच्याकडे आम आदमी पक्ष किंवा भाजप असे दोनच पर्याय उरले असताना ते कोणत्या पक्षात जाणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित केले आहे त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल आणि पक्षाच्या कामावरून टीका केली होती. काँग्रेसमध्ये तीन वर्षे वाया गेल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून ते भाजपच्या संपर्कात होते. येत्या २ जून रोजी ते गुजरातचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
हार्दिक पटेल हे राज्यातील पाटीदार समाजाचे नेतृत्व करतात. या समाजाच्या आरक्षणासाठी त्यांनी आंदोलनही केले होते. पटेल आता भाजपमध्ये गेल्याने या समाजाचा पाठिंबा भाजपच्या दिशेने वळणार आहे. भाजपमधील त्यांची जबाबदारी स्पष्ट झाली नसली तरी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला याचा नक्कीच फायदा होणार आहे.
भाजप पक्षप्रवेशामुळे काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. राजकारणात प्रवेश केल्यानंतर हार्दिक पटेल यांनी भाजपला कडाडून विरोध केला होता. त्याचवेळी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
विधानसभा निवडणुकांचा प्रचार करत असताना भाजपने त्यांची एक सीडी व्हायरल केली होती. या सीडीवरून राज्याचं
राजकरण तापले होते. एकेकाळी भाजपला कडाडून विरोध करणारे हार्दिक पटेल आज भाजपचे कौतुक करताना दिसत आहेत.
कालच त्यांनी भाजप पक्षप्रवेशावरून विधान केले होते. ” मी सोमवारी भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला कळवू.” असे हार्दिक पटेल म्हणाले होते. परंतु, आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या:-
आर्यन खान प्रकरण महागात पडलं, एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांची मुंबईतून उचलबांगडी
मला पाठिंबा देऊन संसदेत पाठवणाऱ्या आमदाराला टाटा सफारी देणार; उमेदवाराची मोठी ऑफर
शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या; गोपीचंद पडळकरांचे पवारांवर पुन्हा गंभीर आरोप






