ज्ञानवापी मशिदीवरून सध्या देशभरात प्रचंड वाद सुरू आहे. या वादात आता भीम आर्मीचे प्रमुख आणि आझाद समाज पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांनी उडी घेतली आहे. देशाची अर्थिक स्थिती बिघडल्याने या मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
मंदिर-मशिदीच्या वादाने नागरिकांचे पोट भरत नाही. नागरिकांच्या समस्या याहूनही अधिक गंभीर आहेत. देशाची अर्थिक स्थिती बिघडल्याने या मूळ प्रश्नावरून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भाजपची ही खेळी असल्याचा आरोप चंद्रशेखर आझाद यांनी केला आहे. यावेळी ते नांदेडमध्ये आयोजित दलित पँथरच्या कार्यक्रमासाठी आले होते.
तसेच म्हणाले, सम्राट अशोक यांनी देशात ८४ हजार बुद्ध विहार बांधले होते. देशातील अनेक धार्मिक स्थळं बुद्ध विहारांवर आहेत. यामुळे भाजपाने हे प्रकरण थांबवलं नाही, तर आम्ही देखील आमच्या बुद्ध विहारांसाठी न्यायालयात जाऊ. न्यायालयात धाव घेतल्यास भाजपचे लोक ठिकाणावर येतील.
भाजपवर निशाणा साधत म्हणाले, इतिहासच खोदू काढत असाल तर आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी आणि झारखंड येथील शिरपूरधाम हे बुद्ध विहारावर बांधले गेले आहेत. त्यावर देखील आम्ही दावा करू, खोदकामच करायचं असेल, तर थोडं खालून करा. इथे बुद्ध सापडतील.
पुढे म्हणाले, भाजपकडून अशाच प्रकारे समाजात द्वेष निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न केला गेला, तर आम्हीही आमचा इतिहास आणि वारसा मागण्यासाठी न्यायालयात जाऊ. आधी आम्ही त्या वारसांवर दावा करू, असे चंद्रशेखर आझाद म्हणाले.
तिरुपती बालाजी मंदिराच्या ठिकाणीही बौद्ध विहार होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही याचा उल्लेख केला आहे. फक्त एवढेच नव्हे तर अशी अनेक ठिकाणं आहेत. तिथे ८४ हजार बौद्ध स्तूप असतील, असे देखील चंद्रशेखर आझाद म्हणाले. चंद्रशेखर आझाद यांच्या विधानाने आता राजकीय वर्तुळात पुढे काय पाहायला मिळते हे पाहणं आवश्यक राहील.