धक्कादायक! २२ प्रवाशांसह विमान झाले बेपत्ता, अचानक संपर्क सुटल्याने उडाली खळबळ

नेपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. नेपाळच्या तारा एअरलाईनचे विमान बेपत्ता झाले आहे. या विमानात नेपाळच्या लोकांसोबतच भारतीय लोक देखील आहेत. या विमानात एकूण 22 प्रवासी आहेत. विमान बेपत्ता झाल्याने आता त्याची शोधमोहीम सुरू आहे.

तारा एअर ९ NAET या विमानाचा वाहतूक नियंत्रणाशी संपर्क तुटला आहे. तारा एअरच्या या छोट्या प्रवासी विमानात एकूण २२ प्रवासी असल्याची माहिती आहे, त्यापैकी चार भारतीय, तीन जपानी बाकी नेपाळी असल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान पोखराहून जोमसोमला जात असताना वाटेत नियंत्रण कक्षाशी त्याचा संपर्क तुटला अशी माहिती समोर येत आहे.

राजधानी काठमांडूपासून ८० किमी उत्तर-पश्चिमेस असलेल्या स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.५५ वाजता या विमानाने पर्यटन केंद्र पोखरा येथून जोमसोमकडे उड्डाण केले होते, पण मुस्तांगच्या टेकआउट भागात पोहोचल्यानंतर विमानचा संपर्क तुटला.

मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोम येथे आकाशात दिसले, त्यानंतर ते धौलागिरीच्या पर्वतांकडे वळले आणि तेव्हापासून याबद्दल काहीही माहिती नाही. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी गृह मंत्रालयाने तातडीने दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत.

नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराचे एमआय-१७ हेलिकॉप्टर घेऊन ते मुस्तांगला रवाना झाले असून, हे विमान येथेच कोसळले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. शोध मोहिमेसाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहे.