मला दिलेली साथ मी आयुष्यभर विसरणार नाही; अजित पवारांच्या सासरवाडीत जाऊन सु्प्रिया सुळे भावूक

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. दौऱ्याची सुरुवात त्यांनी तेर येथील संत गोरोबा काकांचे दर्शन घेऊन केली. मंदिर संस्थानने सत्कार केल्यानंतर सुप्रिया सुळे बोलत होत्या, यावेळी त्यांनी भाजप नेते पद्मसिंह पाटील यांच्या गतकाळातील आठवणींना उजाळा दिला.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजप नेते डॉ. पद्मसिंह पाटील व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे ऋणानुबंध हे गेली अनेक वर्षाचे आहेत. शरद पवार यांच्या चांगल्या वाईट काळात डॉ. पद्मसिंह पाटील यांनी पाठीशी उभे राहत साथ दिली. पाटील यांनी दिलेली साथ मी तरी आयुष्यभर विसरणार नाही, असे म्हणाल्या.

तसेच गावाच्या विकासाबद्दल बोलताना म्हणाल्या, तेर गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. तसेच गोरोबा काकाच्या परिसराची दुरावस्था ही अशोभनीय आहे. अजितदादाची तेर ही सासरवाडी असल्यामुळे इथला विकास झाला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

यावेळी आमदार विक्रम काळे, राहुल मोटे, जिवन गोरे, युवती प्रदेश अध्यक्षा सक्षणा सलगर, जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संयज पाटील दुधगावकर, महेंद्र धुरगुडे यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, तेर गावातील नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, २०१९ मध्ये आ. राणा जगजितसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, पद्मसिंह पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला यामुळे या दोन्ही कुटुंबात दुरावा निर्माण झाला होता. मात्र आज सुप्रिया सुळे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिल्यामुळे सर्वत्र चर्चेला तोंड फुटलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी महागाई वरून मोदींवर निशाणा साधला होता. गरीबांना मोफत सिलेंडर देतो सांगून इतरांची सबसिडी काढून घेतली. ना गरिबांना सिलेंडर दिलं, ना इतरांना. महिलांना मोदींच्या धोरणामुळे पुन्हा चुलीकडे वळावं लागलंय. यांचा फोटो पेट्रोल पंपावर असतो. पण यांना फक्त जाहिरातबाजी करता येते, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.