भ्रष्टाचार विरोधात लढणे हीच ‘आप’ ची ओळख आहे. मात्र, आता या पक्षातील एका मंत्र्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्या मंत्र्याची मंत्रिमंडळातून लगेच हकालपट्टी केली. मान यांच्या या निर्णयानंतर आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
झालेली घटना म्हणजे, पंजाबमधील भगवंत मान यांच्या मंत्रीमंळातील आरोग्यमंत्री विजय सिंगला यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी सिंगला यांची तातडीने मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली आहे. भगवंत मान यांच्या निर्णयाचे कौतूक करतेवेळी केजरीवाल यांना अश्रू अनावर झाले.
आरोग्य विभागातील खरेदी व निविदा प्रक्रियेसाठी आरोग्यमंत्री सिंगला एक टक्का कमिशन घेत असल्याच्या तक्रारी होत्या. सिंगला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी सिंगला यांना अटक केली. सिंगला यांना अटक होताच मान यांनी त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेतला.
केजरीवाल यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ ट्विट करत भगवंत मान यांचे कौतूक केले आहे. यात ते म्हणाले, भगवंत मला तुमचा अभिमान वाटतो, तुझ्या आजच्या निर्णयानं माझ्या डोळ्यात अश्रू आले. सगळ्या देशाला आज आपचा अभिमान वाटतोय, अशी भावनाही केजरीवालांनी व्यक्त केली.
या प्रकरणी बोलताना भगवंत मान म्हणाले, आरोग्य विभागातील खरेदी अथवा निविदा प्रक्रियेसाठी मंत्री एक टक्का कमिशन घेत असल्याचे माझ्या निदर्शनास आले. हे प्रकरण मी अतिशय गांभीर्याने घेतले. हे फक्त मलाच माहिती होते. विरोधी पक्ष अथवा प्रसारमाध्यमांनाही याबद्दल काही माहिती नव्हते.
या मंत्र्यावर मी कठोर कारवाई करत आहे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करत आहे. पोलिसांनाही त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले असून, या मंत्र्याचे नाव विजय सिंगला आहेत, असे भगवंत मान म्हणाले. तसेच आरोग्य विभागातील चुकीच्या गोष्टीत सहभागी झाल्याची कबुली आरोग्यमंत्री सिंगला यांनी दिल्याचा दावाही मुख्यमंत्री मान यांनी केला आहे.