देशातील राजकारण सध्या धार्मिक मुद्यावरून चांगलेच तापलेले आहे. ज्ञानवापी मशीद, ताजमहाल, मथुरा जन्मभूमी कुतुबमिनार याबाबत धार्मिक दावे आणि वादांची परिस्थिती आहे. यावरून समाजात दोन गटात तेढ निर्माण केला जात आहे. मात्र, दुसरीकडे देशातील अनेक मुस्लिम शासक आणि सम्राटांनी हिंदू धार्मिक स्थळे बांधण्यासाठी मदत केल्याची माहिती इतिहासात मिळत आहे.
अनेक हिंदू धार्मिक स्थळे बांधण्यासाठी मुस्लिम शासक आणि सम्राटांनी मदत केली आहे, यात दक्षिणेतील अनेक मुघलसम्राट आणि मुस्लिम शासकांचा समावेश होता, असे इतिहासात सापडते. या कामात हैद्राबादचा सातवा निजाम उस्मान अली यांचे नाव घेतले जाते.
निजाम उस्मान अली यांचा जगातील सर्वात श्रीमंत लोकांमध्ये समावेश होता. त्यांच्या संपत्तीचे किस्से जेवढे प्रसिद्ध होते, तितकेच त्यांच्या कंजूषपणाबद्दल बरेच काही बोलले गेले. मात्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्य अभिलेखागार आणि संशोधन संस्थांच्या नोंदी दर्शवतात की हैद्राबादच्या निजामाने हिंदू मंदिरात अनेक वेळा मोठ्या देणग्या दिल्या.
तसेच, पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या एका धार्मिक मासिकाला त्यांनी आर्थिक मदत केली असल्याचे आढळते. यासोबतच निजाम उस्मान अली यांनी अनेक हिंदू व्यवस्थापनाशी संबंधित शैक्षणिक संस्थांनसाठी मदत केली आहे. हैद्राबादच्या बाग मंदिरासाठी देखील त्यांनी मदत केल्याचे आढळते.
हैद्राबादच्या जुन्या मंदिरांपैकी एक म्हणजे बाग मंदिर आहे. हे हैदराबादच्या मंगलहाटमध्ये 25 एकर परिसरात बांधले असून, एकेकाळी त्याची अवस्था वाईट होती. ही बाब निजामाच्या कानावर येताच त्याने मंदिराच्या नूतनीकरणासाठी आणि पुनर्बांधणीसाठी 50 हजार दिले होते.
तसेच, दक्षिण भारतातील प्रसिद्ध मंदिर श्री सीता रामचंद स्वामी मंदिर यासाठी देखील निजामाने 29 हजार 999 रुपयांची देणगी दिली होती. तिरुपती मंदिरासाठी निजामाने 8 हजार देणगी दिली होती. त्यानंतर पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था जेव्हा आर्थिक अडचणींचा सामना करत होती, तेव्हा मदत करणाऱ्या यादीत निजामाचा देखील समावेश आहे.