संभाजीराजांना ठार मारणाऱ्या, मंदीरे पाडणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला?

सध्या महाराष्ट्रात समाजातील दोन गटात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने राजकारण सुरू आहे. मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा हा मुद्दा गाजल्यानंतर आता हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी एक खळबळजनक सवाल केला आहे. सध्या त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

एमआयएमचे नेते अकबरुद्दी ओवैसी यांनी काल औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकल्याने त्यावर आता टीका होऊ लागली आहे. आनंद दवे यांनी थेट औरंगजेबाच्या कबरीलाच आक्षेप घेतला आहे. औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा सवाल आनंद दवे यांनी केला आहे. यावेळी ते माध्यमांशी संवाद साधत होते.

आनंद दवे म्हणाले, संभाजी राजांना ठार मारणाऱ्या, आमच्या शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या, छत्रपतींच्या पूर्ण परिवारालाच शत्रू समजणाऱ्या, आमच्या दैवतांवर कुऱ्हाड चालवणाऱ्या राज्याच्या सर्वात मोठ्या शत्रूची कबर इथे महाराष्ट्रात कशाला हवी? असा त्यांनी सवाल केला.

तसेच दवे म्हणाले, कसाब, अफझलगुरु, यासिन मलिक यांचा औरंगजेब हा पूर्वज होता. त्याला या मातीत स्थान देण्याची गरजच नाही. औरंगजेबाच्या कबरीच्या पाया पडणं हे हिंदूंना डिवचण्यासाठीच आहे, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने औरंगजेबाची कबर काढूनच टाकावी, अशी मागणीही त्यांनी केली.

त्यांच्या या प्रतिक्रियेमुळे सध्या राजकारण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. आनंद दवे यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अद्याप त्यांच्या या विधानावर एमआयएमकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. बोलले जात आहे की, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीतही हा मुद्दा गाजला जाऊ शकतो.

दरम्यान, अकबरुद्दीन ओवैसी यांनी काल औरंगाबाद दौऱ्यात औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती, म्हणाले, तुम्हाला घाबरायची गरज नाही. जो भी कुत्ता, जैसे भी भोंकता है, उसे भोंकने दो. मी त्यांच्यावर टीका काय करू मी त्यांच्यावर टीका करावी तेवढी त्याची औकात नाही. असे ओवैसी म्हणाले होते.