कोरोना महामारीत अनेक कलाकारांचे निधन झाले. तसेच यंदाच्या वर्षाची सुरुवात देखील भारताने अनेक महान कलाकारांना गमावून झाली. त्यातच आता अजून एक दुःख बातमी समोर येत आहे. प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने संगीत जगतात शोककळा पसरली आहे.
देशभरातच नव्हे, तर जगभरात संतूर या वाद्याला म्युझिकल इन्स्ट्रूमेंट म्हणून लोकप्रिय करणारे आणि भारतीय शास्त्रीय संगीताला नव्या उंचीवर पोहोचवण्यात मोठं योगदान असलेले म्हणजे संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा होय. त्यांचं मुंबईत काल निधन झालं.
पंडित शिवकुमार शर्मा 84 वर्षांचे होते. गेल्या सहा महिन्यांपासून ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते आणि डायलिसिसवर होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन काल झालं आहे. त्यांच्या निधनानं भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास, जम्मू-काश्मीरमध्ये संतूर या वाद्याला एक म्युझिकल इन्स्ट्रूमेंट म्हणून ओळख दिली. त्यानंतर त्यांनी हे वाद्य देशभरातच नाही तर, जगभरात प्रसिद्ध केले. भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्राला एका नव्या उंचीवर पोहोचवण्यात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे.
पंडित शिवकुमार शर्मा यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्यासोबत अनेक चित्रपटांमध्ये संगीत देण्याचं काम केलं. सिलसिला’, ‘लम्हे’ आणि ‘चांदनी’ यांसारख्या चित्रपटांना त्यांनी दिलेल्या संगीतामुळं चार चाँद लागले. पंडित शिवकुमार शर्मा यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
त्यांना 1986 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार, 1991 मध्ये पद्मश्री तर 2001 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 1985 मध्ये बाल्टिमोर या संयुक्त राज्याचे मानद नागरिकत्वही त्यांना प्रदान करण्यात आले आहे. चित्रपटसृष्टीत त्यांनी 1980 साली ‘सिलसिला’ या चित्रपटातून सुरुवात केली होती.