महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंदर्भांत घेतलेल्या निर्णयामुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. राज ठाकरे यांनी 4 मे पर्यंत राज्य सरकारला मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत अल्टीमेटम दिला होता, त्यावर आता अजित पवार यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. म्हणाले, अल्टीमेटम द्यायचा असेल तर घरच्यांना द्या, इथे तुमची हुकूमशाही चालणार नाही.
अजित पवार म्हणाले, काही दिवसांपासून अल्टीमेटम देण्यात येत होता, याबाबत अनेक चर्चा होत होती, मात्र अल्टीमेटमची भाषा करू नका असे आम्ही कित्येक वेळा सांगितले. कारण सरकार हे अल्टीमेटमवर न चालता कायद्याने चालतं. कायदा कोणालाही हातात घेता येणार नाही, सर्वांना नियम सारखे राहतील, असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला.
जो कोणी कायदा सुव्यवस्था अडचणीत आणणार असेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. जी काही धार्मिक स्थळे आहेत, त्यांनी परवानग्या घ्याव्यात. लाऊडस्पीकरचा वापर करताना मर्यादा पाळाव्यात. कोर्टाने जे काही नियम सांगितले आहेत त्याचे पालन करा असे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले.
म्हणाले, जे कोणी नियमानुसार परवानगी घेणार नाही त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार. कोर्टाच्या निर्णयानुसार रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेत भोंगे लावता येणार नाहीत. राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत म्हणाले, इथे हुकूमशाही नाही, कोणीही अल्टीमेटम देऊ नाही, कोणाला द्यायचा आहे, तो घरच्यांना द्या.
तसेच म्हणाले,उत्तर प्रदेशमध्ये अनेक साधू संतांनी, मौलवींनी स्वतः हून आवाहन करत भोंगे उतरवले. त्यामुळे धार्मिक स्थळांवरील भोंगे योगी सरकारनं उतरवले नाहीत. महाराष्ट्र छत्रपतींच्या विचाराने पुढे चालला आहे. कुठेही कायदा अडचणीत येणार नाही अशी खबरदारी घेतली पाहिजे.
आता मनसे विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील आरोप प्रत्यारोपाची मालिका कधी थांबणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अजित पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोणत्या प्रकारची भूमिका घेतात याकडेही सर्वांचे लक्ष आहे.