मनसे कार्यकर्ते आक्रमक, मुंबईत ‘या’ ठिकाणी पहाटेच सुरू झालं हनुमान चालीसा पठण, प्रकरण चिघळण्याची शक्यता

मशिदींवरील भोंग्यावरून सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच तापलं आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर मुंबईतील मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. आज मुंबई मधील चांदिवली आणि चारकोपमध्ये मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावण्यात आली.

राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. अनेक ठिकाणी आज सकाळच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसा लावण्यात आली होती.

राज्य सरकारने काल राज ठाकरेंसह पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवरही कारवाईला सुरूवात केली. मनसेच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी तत्काळ नोटिसा धाडल्या आहेत. पण तरी मनसे आपल्या भूमिकेवर ठाम असलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी आज मनसे कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा लावली आहे.

कार्यकर्त्यांनी आज पहाटेच मुंबई मधील चांदिवली आणि चारकोपमध्ये मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावली आहे. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी चेहरा कॅमेरासमोर न आणता आंदोलन केलं आहे. सध्या या घटनेचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, राज ठाकरेंनी औरंगाबाद सभेत भोंग्यासंदर्भात 4 तारखेपर्यंतचा अल्टीमेटम दिला होता. जर मशिदीवर भोंगे काढले गेले नाहीत तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना दिले होते. याच आदेशाचे पालन आज मनसे कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

आज सकाळी मुंबईतील लोकलमध्येही हनुमान चालिसा म्हटली गेली. सकाळी सात वाजता दादरला जाणाऱ्या लोकलमध्ये हनुमान चालिसा पठण करण्यात आलं. तर माहीम परिसरात पहाटेची अजान झाली नाही. राज ठाकरेंनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करून काही मुस्लीम बांधवांनी आज भोंग्यांवरून अजान वाजवली नाही.