अभिनेता विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे (Shivani Rangole) अखेर विवाहबंधनात अडकले आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची माध्यमात जोरदार चर्चा सुरु होती. तर ३ मे रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहुर्तावर दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यांच्यावर चाहत्यांपासून ते सेलिब्रिटीपर्यंत शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.
विराजस आणि शिवानीने त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर त्यांच्या लग्नसोहळ्यादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत दिसत आहे की, शिवानीने लग्नासाठी लाल रंगाची सिल्क साडी नेसली असून त्यावर साजेसे दागिने घातले आहेत. तसेच हातात हिरवा चुडा, डोक्याला मुंडावळ्या, नाकात नथ अशा मराठमोळ्या लूकमध्ये शिवानी कमालीची सुंदर दिसत आहे.
दुसरीकडे विराजसने (Virajas Kulkarni) लग्नासाठी कुर्ता आणि लुंगी परिधान केल्याचे या फोटोत दिसून येत आहे. दोघेही नववधू-वराच्या रूपात या फोटोत फारच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या या लग्नाचे फोटो समोर येताच चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली. चाहत्यांसोबत अनेक सेलिब्रिटीही त्यांच्या फोटोंवर कमेंट करत दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
यापूर्वी विराजस आणि शिवानीच्या मेहंदी समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर येत्या ७ मे रोजी दोघांनी कलाविश्वातील त्यांच्या मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान, शिवानी आणि विराजस पहिल्यांदा एका नाटकादरम्यान भेटले होते. शिवानी एका इंग्रजी नाटकात काम करत होती तर विराजस त्या नाटकाचे दिग्दर्शन करत होता. या नाटकादरम्यान त्या दोघांची चांगली मैत्री झाली. आणि नंतर त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.
विराजस कुलकर्णी (Virajas Kulkarni) हा मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा मुलगा आहे. त्याने झी मराठी वाहिनीवरील माझा होशील ना या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेतील आदित्य या पात्राद्वारे तो घराघरात पोहोचला. एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच विराजस उत्तम दिग्दर्शकसुद्धा आहे.
विराजसने (Virajas Kulkarni) यापूर्वी अनेक नाटक आणि लघुपटांचे दिग्दर्शन केले. तर आता ‘व्हिक्टोरिया’ या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. नुकतीच या चित्रपटाचे चित्रीकरण स्कॉटलँड येथे पूर्ण झाले असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दुसरीकडे शिवानीने ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत रमाबाईंची भूमिका साकारली होती. मालिकेतील आपल्या सहजसुंदर अभिनयाद्वारे तिने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले होते. यासोबत तिने ‘आम्ही दोघी’, ‘यलो’, ‘चिंटू २’ अशा चित्रपटातही काम केले. याशिवाय तिने स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का?’ या मालिकेत सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसली होती.
महत्त्वाच्या बातम्या :
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘ती’ कामवाली बाई आहे तरी कोण? पहा तिचे ग्लॅमरस फोटो
हृता दुर्गुळेने सोडली ‘मन उडू उडू झालं’ मालिका? स्वतःच खुलासा करत म्हणाली, मी सध्या या मालिकेचे..
माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी स्टार बनली; प्रसिद्ध अभिनेत्रीने केला मोठा गौप्यस्फोट