मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसऱ्यांदा अपघात झाला आहे. या अपघाताने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सभेसाठी पुण्यावरुन औरंगाबादकडे निघाले होते. 30 ते 40 गाड्यांचा ताफा घेऊन राज औरंगाबादकडे येत होते.
पण, त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचे अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार औरंगाबादजवळ (Aurangabad) हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा अपघात मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीला झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, त्यात सुमारे दहाहून अधिक गाड्यांचे नुकसान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे यामध्ये कोणी जखमी झालेल नाहीये. परंतु गाड्यांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. याचबरोबर पहिला अपघात हा नगर शहराच्या पुढे गेल्यानंतर घोडेगावजवळ झाला होता.
अहमदनगरच्या पुढे असलेल्या घोडेगाव जवळ हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेता अंकुश चौधरी यांच्या गाड्यांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कोण कोण जखमी झालंय हे अजूनही कळालेलं नाही.
सदर अपघात हा घोडेगावजवळ झाला आहे एवढंच सध्या समजू शकलं आहे. अपघात कसा झाला समजू शकलेलं नाही पण ताफ्यातील एकामागून एक तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या. यामध्ये केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाड्यांना नुकसान झाले आहे.
दरम्यान, औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी म्हणजे उद्या होणाऱ्या बहुचर्चित सभेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये दाखल झाले आहेत.उद्याची सभा निर्विघ्न पार पडावी यासाठी पुण्यातील राज ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर शेकडो पुरोहित जमले होते. चारही वेदांमधील मंत्रोच्चाराद्वारे जवळपास १०० ते १५० पुरोहितांनी राज ठाकरेंना आशीर्वाद दिले.