राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना कोरेगाव -भीमा हिंसाचार चौकशी आयोगाने समन्स पाठवले आहे. त्यानुसार शरद पवार यांना 5 मे रोजी चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. शरद पवार यांची चौकशी मलबार हिल येथील सह्याद्री अतिथीगृहातील आयोगाच्या दालनात होणार आहे.
चौकशी आयोगातर्फे मुंबईत 5 ते 7 मे आणि 9 ते 11 मे असे सहा दिवस साक्षी नोंदवण्याचे काम होणार आहे. त्यापैकी पहिल्याच दिवशी पवारांना चौकशीसाठी बोलाविण्यात आलं आहे. आयोगाने 5 मे रोजी पवार यांना हजर राहण्यास सांगितले आहे.
यापूर्वी देखील शरद पवार यांना साक्ष नोंदवण्याकरिता पाचारण करण्यात आलं होतं. निवृत्त न्यायमूर्ती जय नारायण पटेल व मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक यांचा समावेश असलेल्या द्विसदस्यीय चौकशी आयोगाने 23-24 फेब्रुवारी रोजी साक्ष नोंदवण्याकरिता पवार यांना पाचारण केलं होतं.
मात्र, त्यावेळी शरद पवार यांनी अतिरिक्त प्रतिज्ञापत्र द्यायचे असल्याचे सांगून आयोगाला पुढची तारीख देण्याची विनंती केली होती. त्यामुळे, आता आयोगाने मुंबईत 5 ते 11मे या कालावधीत होणाऱ्या सुनावणीदरम्यान पहिल्याच दिवशी म्हणजे 5 मे रोजी पवार यांना हजर राहण्यास सांगितले आहे..
भीमा कोरेगाव येथे झालेल्या प्रकाराबाबत शरद पवार यांनी पुणे पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला होता, आणि एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यासाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. त्यानंतर हा आयोग नेमण्यात आला होता.
या आयोगानं 18 मार्च 2020 रोजी शरद पवारांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावलं होतं. मात्र, करोना लॉकडाऊनमुळं नंतर आयोगाचं कामकाज ठप्प झालं होतं. ते आता पुन्हा सुरू होणार आहे. शरद पवार हे आयोगाने दिलेल्या तारखेला म्हणजेच 5 मेला चौकशीला सामोरे जातील.
1 मे 2018 रोजी पुण्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यावेळी मोठा गोंधळ झाला होता. घटनेचा निषेध म्हणून पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंद दरम्यान पोलिसांनी एकूण 162 जणांवर गुन्हे दाखल केले होते. पुण्यात भरवण्यात आलेली एल्गार परिषद व त्यातील चिथावणीखोर भाषणांमुळं भीमा कोरेगावात हिंसाचार उसळल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्या प्रकरणी अनेकजण तुरुंगात आहेत.