सध्या महाराष्ट्र राजकारणात अनेक घडामोडी होताना दिसत आहेत. हनुमान चालिसा आणि मशिदींवरील भोंगे, राणा दाम्पत्याला अटक, किरीट सोमय्यांवर हल्ला अशा अनेक घडामोडी लागोपाठ होत आहेत. त्यामुळे राजकीय वातावरण अधिक तापलं आहे. त्यातच आता किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्याबद्दल मोठं विधान केलं आहे.
किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आय़ुक्त संजय पांडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय पांडेंनी आपल्या विरोधात बोगस एफआयआर दाखल केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. यावर आता भाजप आक्रमक झाले असून, पक्षाचे नेते आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
किरीट सोमय्या संजय पांडे यांच्याबद्दल प्रसारमाध्यमांना बोलताना म्हटले की, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी माझा एफआयआर नोंदवून न घेण्याचे आदेश सर्व पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे आम्ही लवकरच राज्यपालांची भेट घेत आहोत आणि गरज पडल्यास या प्रकरणात आम्ही उच्च न्यायालयातही जाणार आहे.
किरीट सोमय्या यांच्यासोबत आज गोपाळ शेट्टी, मंगल प्रसाद लोढा, सुनील राणे हे भाजपा नेतेही राज्यपालांची भेट घेणार आहेत. यापूर्वी किरीट सोमय्या यांनी दिल्लीमध्ये जाऊन केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्यासह केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांची भेट घेतली होती.
तसेच म्हणाले, संजय पांडेंना दीड महिन्यामध्ये शिवसेनेत प्रवेश करायचा आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी किरीट सोमय्या हे खार पोलीस स्थानकात गेले होते. त्यावेळी तुफान राडा झाला. शिवसैनिकांच्या रोषाला किरीट सोमय्या यांना जावं लागलं.
Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ordered a police officer not to register my FIR. He wants to join Shiv Sena after 1 and a half months. We will go to the Governor soon and if necessary also to the High Court to discuss this matter: BJP leader Kirit Somaiya pic.twitter.com/07aphPiw1t
— ANI (@ANI) April 27, 2022
त्यानंतर झालेल्या दगडफेकीत किरीट सोमय्या यांच्या गाडीची काच फुटली. किरीट सोमय्या यांनाही जखम झाली. त्यावेळी, माझ्यावरील हल्ल्याला पोलीस आयुक्त संजय पांडेच जबाबदार आहेत, असा थेट आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता.
किरीट सोमय्या यांनी केंद्रीय गृहसचिवांकडे पांडे यांची तक्रार केली होती. संजय पांडे यांनी माझ्या नावाने खोटा एफआयआर दाखल केला. तसेच खार पोलीस ठाण्याबाहेरील सीसीटीव्ही फुटेजही गायब केले, असा गंभीर आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.