आजकाल अशा अनेक फ्रॉड मार्केटिंग कंपन्या आहेत ज्या अशिक्षितच नाही तर शिकलेल्या लोकांना देखील पैशाचा मोह दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळतात आणि त्यांना फसवतात. आता जी बातमी समोर येत आहे यामध्ये चक्क डॉक्टर तरुणांना नेटवर्क मार्केटिंग कंपनीने फसवलं आहे.
ही नेटवर्क मार्केटिंग कंपनी मलेशिया येथील आहे. या कंपनीने पालिका तसेच खासगी रुग्णालयांतील असंख्य विद्यार्थी डॉक्टरांना आपल्या जाळ्यात ओढले आहे. लवकरात लवकर श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून कंपनीचे सदस्यत्व घेण्यासाठी या तरुण डॉक्टरांकडून पाच ते नऊ लाख रुपये उकळण्यात आले आहे.
कंपनीच्या प्लान बद्दल माहिती समोर आली आहे की, संबंधित डॉक्टरांनी पैसे भरल्यानंतर या कंपनीतर्फे झूम मीटिंगद्वारे पिरॅमिड पद्धतीने नवे ग्राहक तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येते. पहिल्या टप्प्यात कुटुंबातील सदस्य, मित्रमैत्रिणींना जोडून घ्या, असेही सांगण्यात येते. एका ग्राहकाला या साखळीशी जोडून घेतल्यानंतर त्यावर कमिशन देण्याचे आश्वासन मिळते.
यासाठी डॉक्टरांना दिवसातील तीन तास द्यावे लागतात. या कंपनीच्या भूलथापांना बळी पडून मुंबई, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, जळगावसह राज्याच्या इतर वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थी डॉक्टरांनीही झटपट श्रीमंत होण्याच्या नादापायी यात आपले पैसे गुंतवले. हे काम ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने वैद्यकीय सेवेवर त्याचा परिणाम होत नाही.
मात्र या कंपनीचा फ्रॉड तेव्हा समोर आला जेव्हा, दरमहा कबूल करण्यात आलेले हजारो रुपयांचे कमिशन आणि महागड्या भेटवस्तू वर्ष उलटूनही डॉक्टरांना मिळाल्या नाहीत. विशेष म्हणजे या कंपनीने या डॉक्टरांच्या कोणत्याच मेलला प्रतिसाद दिला नाही. यासंबंधीची तक्रार केईएम रुग्णालयातील डॉ. आदित्य अणवेकर यांनी शीव पोलिस ठाण्यात केली आहे.
डॉ. आदित्य अणवेकर यांना अवघ्या सात दिवसांमध्येच या प्रकरणामध्ये काळेबेरे असल्याचे लक्षात आले. त्यांनी 9 सप्टेंबर, 2021 रोजी यामध्ये काम करायचे नसल्याचा निर्णय कळवला आणि कूपर रुग्णालयामध्ये काम करणाऱ्या मध्यस्थांकडे पैसे परत द्या, अशी मागणी केली. मात्र त्यांनी कंपनी मलेशियामध्ये असल्याने आता पैसे परत देता येणार नाही, असे सांगितले. त्यांनी तक्रार दिल्यानंतर आता पोलीस तपास करत आहेत.