काल अॅड सदावर्ते यांच्या घरात आढळलेल्या वस्तूंमुळे यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होणार असल्याचं दिसतं आहे. अॅड सदावर्ते यांच्या घरातून ताब्यात घेतलेल्या हिरव्या रंगाच्या रजिस्टरमध्ये 250 डेपोतून पैसे कसे गोळा करायचे याचा उल्लेख असल्याचा दावा सरकारी वकिल प्रदीप घरत यांनी केला आहे.
तर आता एक वेगळी बातमी समोर येत असून अॅड सदावर्ते यांचा पाय आणखी खोलात जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. दरम्यान, सध्या सदावर्ते हे मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६ मजली इमारतीत राहतात. मात्र या इमारतीला अद्याप मुंबई महानगरपालिकेचं भोगवटा प्रमाणपत्र मिळालेलं नसल्याची माहिती समोर आली आहे.
यामुळे सदावर्तेंचं राहतं घर अनधिकृत ठरवण्यात आलं आहे. तसेच मिळालेल्या माहितीनुसार, सदावर्ते यांच्यासह इमारतीतल्या रहिवाशांना अनधिकृत रहिवासी म्हणून घोषित करण्यात आलं आहे. याचबरोबर या सर्वांनाच प्रस्ताव विभागाकडून 353 ए अन्वये दोनदा नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, मूळ इमारत आराखड्यात फिटनेस सेंटर म्हणून दाखवण्यात आली आहे. मात्र बिल्डरने त्यात कोणतीही परवानगी न घेता बदल करून ते सदावर्तेंना विकलं. याबाबत सदावर्तेंना 347 (ए) नुसार अधिकृतपणे बदल केल्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांकडून पैसे घेतल्याची सदावर्ते यांनी कबुली दिल्याचा सरकारी वकिलांनी दावा केला आहे. तर सदावर्तेंनी कोर्टात स्वत:ची बाजू मांडताना सर्व आरोप खोडून काढलेत. कोर्टाच्या कामकाजासाठी पैसे घेतल्याचा त्यांचा दावा आहे.