कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जीव माझा गुंतला’ (Jeev Majha Guntala) ही मालिका छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करत लोकप्रियता मिळवली. मालिकेतील प्रत्येक कलाकारही आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकून घेत आहेत. तर या मालिकेत श्वेता ही खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे पूर्वा शिंदे.
‘जीव माझा गुंतला’ मालिकेत पूर्वा नकारात्मक भूमिका साकारत असली तरी खऱ्या आयुष्यात ती अजिबात तशी नाही. परंतु, ती साकारत असलेल्या नकारात्मक भूमिकेमुळे लोक तिला भेटण्यास नकार देतात, असा खुलासा पूर्वाने नुकतीच एका मुलाखतीत बोलताना केला आहे. तसेच तिच्याशी एकदा बोलल्यानंतर लोकांचा गैरसमज दूर होतो, असेही तिने यावेळी म्हटले आहे.
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, पूर्वाने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले की, ‘मी अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत. परंतु, मी वैयक्तिक आयुष्यात खूप चांगली आहे. मला भेटण्यासाठी अनेकजण नकार देतात. पण मला एकदा भेटल्यानंतर मालिकेतील खलनायिकेचे पात्र आणि आणि माझ्यातील फरक त्यांना कळतो. तेव्हा त्यांचा गैरसमज दूर होतो’.
यावेळी पूर्वाला मालिकेतील तिचा आवडता मित्र कोण? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पूर्वाने सांगितले की, ‘माझा आवडता मित्र किंवा मैत्रीण अशी एक व्यक्ती म्हणून कोणीही नाही. माझी सगळ्यांसोबत मैत्री जमते. पण मी आणि चित्रा खूप मस्ती करतो’.
पुढे पूर्वाला विचारण्यात आले की, ‘सेटवर सर्वात जास्त मस्ती कोण करतं?’ या प्रश्नाचे उत्तर देताना पूर्वाने म्हटले की, ‘मालिकेच्या सेटवर सर्वात जास्त मस्ती मीच करते. इतर सर्वजण खूप शांत असतात. त्यामुळं माझं शूटिंग संपलं की, मला सर्वजण सेटवरून हकलवून लावतात आणि घरी जा असे सांगतात’.
दरम्यान, पूर्वा शिंदेने आतापर्यंत अनेक मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केले आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेमुळे तिला फार लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेत तिने जेडी हे नकारात्मक पात्र साकारून प्रेक्षकांकडून कौतुक मिळवले होते. तर आताही ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेद्वारे ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
तसेच पूर्वा झी युवावरील ‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमध्येही सहभागी झाली होती. याशिवाय ‘चला हवा येऊ द्या’ च्या ‘लेडीज झिंदाबाद’ या पर्वातही ती दिसली होती. सोशल मीडियावरही पूर्वा नेहमी सक्रिय असते. याद्वारे अनेक पोस्ट शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. अनेकदा ती याद्वारे शेअर करण्यात येणाऱ्या बोल्ड फोटोंमुळेही नेहमी माध्यमात चर्चेत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
रणबीर-आलियानंतर ‘ही’ मराठमोळी जोडी अडकणार लग्नबंधनात; लग्नाची तारीखही केली जाहीर
‘Indian Idol Marathi’ला मिळाले टॉप 5 स्पर्धक, ‘या’ दिवशी होणार विजेतेपदासाठी लढत, प्रेक्षक उत्सुक
ड्रग्स घेऊन मला कुल वाटायचं, मग मी बिनधास्तपणे मुलींसोबत.., संजय दत्तचा मोठा खुलासा