यावर खुद्द शरद पवारांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. “राज ठाकरे म्हणाले की मी नास्तिक आहे. मी माझ्या देवधर्माविषयीचं प्रदर्शन कुठे करत नाही. मी १३-१४ वेळा निवडणुकीला उभा राहिलो. निवडणुकीचा नारळ कुठे फोडतो, हे बारामतीच्या लोकांना जाऊन विचारा. एकच मंदिर आहे. तिथे फोडतो. त्याचा आम्ही कुठे गाजावाजा करत नाही”.
पुढे बोलताना पवार म्हणाले, ‘माझ्यापुढे प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. त्यांनी देवधर्माचा बाजार मांडणाऱ्या प्रवृत्तींवर प्रचंड टीका केली आहे. त्याचा गैरफायदा घेणारा कुणी घटक असेल, तर त्याला ठोकून काढण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं लिखाण आम्ही लोक वाचतो, असे पवार म्हणाले.
शरद पवारांनी केलेल्या विधानानंतर प्रचाराचा पहिला नारळ कुठं फुटतो? याची चर्चा राज्यात सुरू झाली. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा असल्याची माहिती मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या मंदिराचे पुजारी महादेव शिंदे यांनी याबाबत माहिती दिली आहे.
याबाबत सांगताना मंदिराचे पुजारी महादेव शिंदे म्हणतात, ‘पवार कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे कन्हेरी येथील मारुती मंदिरावर श्रद्धा ठेवली आहे. याचबरोबर याच मंदिरात प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जातो. आणि तिथून पुढचं प्रचाराचा शुभारंभ केला जातो.’
तसेच पुढे बोलताना ते सांगतात, ‘केवळ निवडणुकीपुरतं पवार कुटुंब या मंदिरात येतं नाही, तर अनेकदा वेळ मिळेल तेव्हा पवार कुटुंबीय या मारुती मंदिरात येत असल्याची माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली. दरम्यान, पवार यांनी कधीही आपल्या श्रद्धांचे प्रदर्शन केले नाही. त्यामुळे ते नास्तिक की आस्तिक अशी कधीतरी चर्चा होत असते.