सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस हा वाद वाढतच चालला आहे. राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आणि एकूणच राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर टीका केली होती. त्याला जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर दिल्यानंतर आता पुन्हा एकदा मनसेने थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.
राज ठाकरे यांनी काल ठाण्यातील उत्तर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. आव्हाड यांचा चेहरा म्हणजे नागानं फणा काढावा असा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. यावर जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिउत्तर देत म्हटले की ‘मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे हे म्हणावं का ?असा प्रश्न विचारला.
आव्हाड यांनी दिलेल्या प्रतिउत्तरांवर मनसे नेत्यांनी पुन्हा एकदा उत्तर देत थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधत असताना, आव्हाड यांनी राज ठाकरेंवर केलेल्या टीकेसंदर्भात प्रतिक्रिया दिली.
अविनाश जाधव म्हणाले, मला वाटतं त्यांनी चेहऱ्यावर टीका करण्याआधी त्यांच्या नेत्याचा चेहरा पाहावा आणि आम्हाला सांगावं की म्हशीच्या कुठल्या भागासारखा त्यांचा चेहरा दिसतो. पण आम्ही असं म्हणणार नाही, पवारसाहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. पण त्यांनी टीका करताना तारतम्य पाळावं, अशी आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे.
तसेच म्हणाले, फुकट तुम्ही पत्रकार परिषदेत तत्त्वाच्या गोष्टी करता. नंतर अचानक तुम्ही काहीही बडबडता. हे बरोबर नाही. असं अविनाश जाधव म्हणाले. आता अविनाश जाधव यांच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या पद्धतीने पलटवार करणार हे पाहावं लागेल.
दरम्यान राज ठाकरे काल उत्तर सभेत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना म्हणाले, इकडचे ते आव्हाड.. नागाने फणा काढावा असा चेहरा आहे. आता उद्या काय तरी बोलतीलचं डसू शकतो.. बिसू शकतो.. ये शेपूट धरतो.. गरगर फिरवतो आणि फेकून देतो. असे म्हणत आव्हाड यांची नक्कल देखील केली होती.