Share

‘मशिदीवरील भोंग्यांना आमचा विरोध नाही’ राज ठाकरेंच्या विरुद्ध भूमिका घेणारे वसंत मोरे भेटीनंतर भावुक, म्हणाले…

vasant more & raj thakre
मनसेचे पुण्याचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे यांना अखेर पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. महत्त्वाचं म्हणजे वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र मोरे यांना तातडीने कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर रविवारी (काल) राज ठाकरे यांनी प्रतिसाद दिल्यानंतर भेटीची वेळ निश्चित झाली.

गुढीपाडवा मेळाव्यातील मनसेप्रमुख राज ठाकरेंचे भाषण सध्या चांगलेच चर्चेत आहेत. तुम्ही मशिदीवरील भोंगे नाही उतरवलेत, तर आम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा सुरु करु, असा इशारा राज यांनी दिला होता. असे असले तरी काही मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेला स्पष्ट नकार दिला आहे.

मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दांमध्ये राज ठाकरे यांच्या भूमिकेला नकार दिला. त्यानंतर पक्षाने मोरेंविरोधात मोठं पाऊल उचललं. मोरे यांना थेट पुणे शहराध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर मोरे सातत्यानं राज यांच्या भेटीसाठी वेळ मागत होते. अखेर आज मोरे आणि राज ठाकरेंची भेट झाली.

या भेटीनंतर मोरे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. भेटीनंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘माझ्या सर्व शंकांचं निरसन राज ठाकरेंनी केलं. त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं झालं. उद्या ठाण्यात राज यांची सभा आहे. त्या सभेला ये. तिथे तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, असं राज ठाकरेंनी सांगितल्याची माहिती मोरेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

पुढे बोलताना मोरे यांनी सांगितलं की, आपल्या सर्व शंका दूर झाल्या आहेत. आपण पक्षातच राहणार आहोत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्याला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपकडून ऑफर असल्याचा दावा केला होता. मात्र  मनसे सोडून जाणार नसल्याचंही आता त्यांनी स्पष्टच सांगितलं.

दरम्यान, तसेच यावेळी पत्रकारांनी या भेटीनंतर तुम्ही समाधानी आहात का?, असा प्रश्न विचारला असता, मोरेंनी, “मी १०० टक्के समाधानी आहे,” असं सांगितलं. ‘मी समाधानी होऊनच इथून चाललोय. मागील दोन तीन दिवसांपासून ज्या काही चर्चा होत्या त्यादरम्यानही मी सांगत होतो की मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आहे आणि मनसेमध्येच राहील, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या 
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now