Share

PHOTO: वडिलांनी दार उघडलं अन् समोर अशोक सराफ; किरण मानेंनी शेअर केल्या जुन्या आठवणी

kiran mane

मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) हे त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतात. या पोस्टद्वारे ते आपले बिनधास्त आणि रोखठोक मत मांडत असतात. ग्रामीण भाषेचा लहेजा त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे जाणवतो. आताही किरण माने यांची एक पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे. या पोस्टमध्ये किरण यांनी अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतचा एक किस्सा सांगत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.

किरण माने यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ही पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री श्वेता शिंदेसोबतचे फोटो शेअर करत एक मोठी पोस्ट लिहिली आहे. जुने फोटो पाहताना किरण यांना अशोक सराफ यांच्यासोबतचे हे फोटो सापडले असून यामुळे त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या, असे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

त्यांनी लिहिले की, ‘एक दिवस दारावरची बेल वाजली आन् “किरन्याSव” अशी हाक आली. वडलांनी दार उघडलं आन् आग्ग्गाय्याय्यायाया.. त्यांचा डोळ्याव इस्वासच बसंना… दारात चक्क अशोक सराफ ! ‘हे..नाय..आप्लं…हाय, हाय..हाय की किरन…या की..या या’ अशी अवस्था झाली दादांची. मामांबरोबर आमची सातारकरीन आनि पाव्हनी श्वेता शिंदे होती. तिनंच घर दावलं मामांना. बारा वर्ष उलटून गेली ह्या गोष्टीला पन फोटू बगीतले की अजूनबी ताजी वाटती’.

‘…खरंतर लै लै लै महान नट अशोकमामा, पन सोत्ताच्या मोठेपनाचं समोरच्यावर कधी दडपन येऊ देत नाय. पांडू हवालदारपास्नं बिनकामाचा नवरा पर्यन्त… गोंधळात गोंधळपास्नं धुमधडाकापर्यन्त… आनि बनवाबनवीपास्नं एक डाव धोबीपछाडपर्यन्त गेली अनेक वर्ष पडद्यावर बगीलेल्या आपल्या आवडत्या नटाला आपल्या घरात, आपल्यासमोर बगून, हरखून गेलेल्या माझ्या घरातल्यांसोबत, मामांनी दोन तास दिलखुलास-मनमोकळ्या गप्पा मारल्या… मनसोक्त पोटपूजाबी केली !’

‘बोलता-बोलता मामा अचानक माझ्या वडलांना-दादांना म्हन्ले, ‘एकतर मी खोटं बोलत नाही आणि दूसरं म्हणजे मी प्रत्येकाबद्दल असं बोलत नाही, हे आधी सांगतो. तुमचा मुलगा किरण हा ब्रिलीयंट ॲक्टर आहे. तो या इंडस्ट्रीत स्वत:चं स्थान निर्माण करेल. बघाच तुम्ही’.

‘…दादांचे डोळे पान्यानं डबडबले भावांनो.. मामा, तुमी हे सहज बोलून गेलात. पन दादांचा माझ्यावरचा विश्वास आयुष्यभरासाठी घट्ट केलात. नोकरी-धंदा सोडून अभिनयासारख्या बेभरवशाच्या क्षेत्रात जान्याच्या माझ्या निर्णयानं, माझ्यावर कायम नाराज असलेले माझे वडिल, तवापास्नं माझे फॅन झालेत. माझ्या प्रत्येक चढउतारावर माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत !’

‘…मामा, आनखी काय बोलू? घरातले जुने अल्बम चाळताना हे फोटो सापडले आनि आठवनी जाग्या झाल्या ! लब्यू लैच’, असे किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले. दरम्यान, किरण माने हे स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो या मालिकेत विलास पाटील हे भूमिका साकारत होते. परंतु, त्यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आले. त्यामुळे मोठा वाद झाला होता.

राजकीय भूमिका घेतल्याने आपल्याला मालिकेतून काढण्यात आले, असा आरोप किरण यांनी केला होता. तर किरण मानेच्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे स्टार प्रवाह वाहिनीद्वारे सांगण्यात आले. तसेच या मालिकेतील काही महिला कलाकारांनी एका वाहिनीसोबत बोलताना किरण मानेंवर अनेक आरोप केले. दीर्घकाळ याबाबत किरण माने आणि मुलगी झाली हो मालिकेच्या निर्मात्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरु होते.

महत्त्वाच्या बातम्या :
पार्टीनंतर मी पूजा भट्ट, रवीना टंडन, विक्रम, राहुल रॉयचा ड्रायव्हर व्हायचो, दीप तिजोरींचा खुलासा
Jr NTR ची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना देते टक्कर, पहा सुंदर फोटो
पैसा अन् प्रसिद्धी मिळताच माझं डोकं फिरलं होतं; ‘कच्चा बदाम’फेम भुबन बड्याकरची कबुली

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now