नुकताच दिल्लीत कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पुण्यातील सरहद संस्थेतर्फे संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्यात रॉचे माजी प्रमुख आणि संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी अमरजीत सिंह दुल्लत यांनी एक खळबळजनक वक्तव्य केले आहे.
अमरजीत सिंह दुल्लत म्हणाले, देशाचा पुढचा पंतप्रधान शीख नाही बनला तर मराठा जरूर बनेल. तसेच म्हणाले, आपल्याला देशासाठी संत नामदेव शोधावा लागेल, संत नामदेव महाराजांचं काम विश्वव्यापी आहे. अशा महान संताच्या नावानं पुरस्कार मिळणं माझं भाग्य आहे.
या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील उपस्थित राहणार होते, त्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार होता. मात्र त्यांना काही कारणाने उपस्थिती लावता आली नाही. या सोहळ्यात मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक आणि राँ चे माजी प्रमुख अमरजित सिंह दुलत यांना संत नामदेव पुरस्कार दिला गेला.
या सोहळ्यात जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी अचानक हजेरी लावल्याने हा एक चर्चेचा विषय ठरला. या सोहळ्यात मेघालयचे राज्यपाल सत्यपाल सिंह मलिक म्हणाले की, महाराष्ट्र शौर्य, लढाई, संघर्षासाठी ओळखला जातो तसंच संतांसाठीही ओळखला जातो. संत नामदेव पुरस्कार मला मिळाला हे माझं भाग्य समजतो.
तसेच म्हणाले, या देशातला शेतकरी अजाणतेपणी रोज गरीब होत असतो. तो जे पीकवतो ते धान्य दिवसेंदिवस स्वस्त आणि त्याच्या गरजेच्या वस्तू दिवसेंदिवस महाग होत चालल्यात. शेतकऱ्यांबद्दल माझं काम संपलेलं नाही. मी निवृत्त झाल्यानंतरही आवाज उठवत राहणार आहे.
अचानक सोहळ्याला हजेरी लावणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील यावेळी आपलं मत व्यक्त केले म्हणाले, या देशाला भूक मारणार नाही तर द्वेष मारेल. भारताला प्रेमानं वाचवायचंय, मरणाआधी असा हिंदुस्थान पाहायचा आहे. असे ते म्हणाले.