शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील संपत्ती ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. यावर आता राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेवर सतत टीका करणारे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी थेट पत्रकार परिषद घेऊन राऊतांवर निशाणा साधला.
सोमय्या म्हणाले, ‘आम्ही तक्रार करताना पुरावे देतो. 55 लाख त्यांनी भरले होते. म्हणजे राऊत यांनी गुन्हा कबुल केला आहे.’ गेले दोन महिने राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, नील आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो,” असं सोमय्या म्हणाले.
तर दुसरीकडे माध्यमांना प्रतिक्रिया देताना पत्रकारांनी सोमय्यांचं नाव घेतले असता तर राऊत चांगलेच भडकले. राऊत म्हणाले, किरीट सोमय्या चु… आहे, महाराष्ट्रद्वेष्टा आहे. जो माणूस मराठीच्या विरोधात कोर्टात जातो. महाराष्ट्र द्रोही आहे, असं बोलत राऊतांनी टीकास्त्र सोडलं.
पुढे बोलताना राऊत यांनी त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत भाष्य करताना म्हणाले, ‘आम्ही कष्टाच्या पैशातून ही प्रॉपर्टी घेतली असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. त्यात कोणतंही मनी लॉन्ड्रिंग झालेलं नाही. 2009मधील ही प्रॉपर्टी असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
यावेळी बोलताना राऊत म्हणाले, ‘तपास यंत्रणा राजकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मी तुमच्या बापालाही घाबरत नाही. तुमचा बाप जरी खाली आला, तरी मी गुडघे टेकणार नाही. मी बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे, असे म्हणत राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘या जमिनीच्या व्यवहारासाठी एक रुपया जरी आमच्या खात्यात मनी लॉन्ड्रिंगचा आला असेल आणि मनी लॉन्ड्रिंगच्या पैशातून आम्ही प्रॉपर्टी विकत घेतली असले. तर आम्ही ही प्रॉपर्टी भाजपला दान करून टाकू, असं संजय राऊत यांनी म्हंटले.