औरंगाबाद शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. औरंगाबाद शहरातील कुरियर कंपनीवर छापा टाकण्यात आला, त्यात पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त केला आहे. या तलवारी पंजाब मधून मागविण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितले आहे.
याआधी देखील दोन वेळा कुरियर कंपनीकडून आलेला शस्त्रसाठा जप्त केला होता. आता पुन्हा एकदा हा प्रकार घडला आहे. संबंधित प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच, औरंगाबादच्या क्रांती चौक पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. औरंगाबादमध्येच एवढ्या मोठ्या तलवारी का येतात याचा तपास पोलीस करत आहेत.
माहितीनुसार, सहायक पोलिस आयुक्त अशोक थोरात यांना खबऱ्या मार्फत कुरिअरने शहरात तलवारी आल्याची माहिती मिळाली. यावरून क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. गणपत दराडे, उपनिरीक्षक विकास खटके, प्रभाकर सोनवणे यांच्या पथकाने निराला बाजार येथील डीटीडीसी कुरिअरच्या कार्यालयावर छापा टाकला.
डीटीडीसी कार्यलयात संबंधित कुरियर बद्दल विचारले असता तेथील व्यवस्थापकांनी असे कोणतेही पार्सल आले नसल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी कार्यालयाचा तपास केला. त्यात त्यांना एका पार्सल बॉक्समध्ये मोठ्या प्रमाणावर तलवारीचा साठा आढळून आला.
एकूण सात ग्राहकांनी या तलवारी मागवल्या होत्या. तपासात 37 तलवारी आणि एक कुकरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. शहराच्या निराला बाजार परिसरामध्ये असलेल्या या डीटीडीसी नावाच्या कुरियर कंपनीकडे एकाच दिवशी हा एवढा मोठा शस्त्रसाठा आढळल्यामुळे पोलीस देखील हादरून गेले आहेत.
या तलवारी पोलिसांनी जप्त केल्या असल्या तरी, या कोणी पाठवल्या आणि कोणासाठी आणि कशासाठी पाठवल्या? याचं कोडं अजूनही पोलिसांना उलगडलेलं नाही. कारण या पार्सलवर कोड भाषेत नवं लिहिण्यात आली आहेत. यावर लिहीण्यात आलेली नावं कोडवर्डमध्ये आहेत. जागेचं नावं, व्यक्तीचं पहिलं नाव आणि नंबर आहे.
पार्सल पंजाबमधून आल्यामुळे पोलीस अधिकारी पंजाब पोलिसांशी संपर्क करून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचसोबत पार्सलवर असलेल्या नंबराच्या माध्यमातूनही या तलवारी कोणी मागवल्या त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. आत्तापर्यंत केवळ सात जणांच्या पत्त्यांची माहिती मिळाली आहे.