दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला. हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक भावूक होत आहेत. अशा वेळी तीन राज्यातील सरकारने हा चित्रपट करमुक्त केला आहे.
‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना भिडणारी आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराची कहाणी सांगणारा आहे. काश्मीरचा हा सर्वात संवेदनशील मुद्दा आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट काश्मिरी पंडितांवरील अत्याचार आणि त्यांच्या बेघर होण्याची कहाणी मांडणारा चित्रपट आहे.
या चित्रपटात दहशतवाद्यांनी कशा पद्धतीने काश्मिरी पंडितांना स्वतःचे घर सोडून पळून जाण्यास भाग पाडले याबद्दल माहिती दिली आहे. देशात पहिल्यांदा हरियाणा राज्याने हा चित्रपट करमुक्त केला. हरियाणात 6 मे पर्यंत हा चित्रपट करमुक्त ठेवण्यात आला आहे.
हरियाणा नंतर आता गुजरात, मध्यप्रदेश राज्याच्या सरकारने देखील ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट करमुक्त केला आहे. चित्रपटाची कथा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता आता महाराष्ट्र राज्यात देखील हा चित्रपट करमुक्त करावा अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
जम्मू काश्मीर मध्ये मुस्लीम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट महाराष्ट्र राज्यात करमुक्त करावा. पहिल्यांदाच काश्मीर मधील पंडितांवर झालेला अन्याय चित्रपटाच्या माध्यमातून जनतेला पाहता येईल, अधिकाधिक जनतेला हा चित्रपट पाहता यावा यासाठी हा चित्रपट करमुक्त करण्यात यावा, अशी मागणी आमदार नितेश राणे यांनी केली आहे.
सध्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे शो सुरू आहेत. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 3 कोटी 55 लाखांची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 8.50 कोटींची कमाई केली आहे.