पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या पाच राज्यांमध्ये पंजाब, मणिपूर, गोवा, उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांचा समावेश आहे. यामध्ये मणिपूर विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारतं याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मणिपूरमध्ये 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडली होती. त्या सर्व जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. त्यामुळे सत्तेत कोण येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सध्या मणिपूरमध्ये भाजपाची सरशी होताना दिसून येत आहे. मणिपूरमध्ये भाजपाने तब्बल 25 जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस 13 आणि एनपीएफला 6 तर एनपीपीला 10आणि इतर 6 अशी लढत सुरू आहे. त्यामुळे आता मणिपूर मध्ये भाजप येणार की काँग्रेस टक्कर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मणिपूरमध्ये 28 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले होते. यामध्ये अनेक मतदान केंद्रांवर बूथ कॅप्चरिंग आणि ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचे आरोप झाले होते. या प्रकाराची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. निवडणूक आयोगाने अनेक मतदान केंद्रांवर पुन्हा निवडणुका घेण्याचे आदेश दिले.
तर 5 मार्च रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली होती. मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 जागांसाठी 78.03 टक्के मतदान झाले होते. तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 76.62 टक्के मतदान झाले होते.
मणिपूरमध्ये 60 विधानसभा जागांपैकी 31 जागा जिंकणं बहुमतासाठी आवश्यक आहे. या वेळी कुठलाच एक पक्ष स्पष्ट बहुमत मिळवू शकणार नाही असा बहुतेक exit poll चा अंदाज आहे. सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप बहुतमाच्या आकड्याच्या जवळ पोहोचू शकतो, असंही काही सर्व्हे सांगतात.