Share

”या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का?”

सध्या रशिया आणि युक्रेनमधील युद्ध अधिक तीव्र होत चालले आहे. युक्रेन मध्ये शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. काहींना भारतात सुखरूप आणले गेले तर काही जण अजून अडकलेले आहेत. अशातच नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्यांला रशिया हल्ल्यात जीव गमवावा लागला. यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

युक्रेनमधील खार्किव्हमध्ये सकाळी हवाई हल्ला झाला या हल्ल्यामध्ये नवीनचा मृत्यु झाल्याची माहिती मिळाली आहे. नवीन हा खार्किव्ह नॅशनल मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाला शिकत होता. नवीनला भूक लागली होती आणि काहीतरी खाद्यपदार्थ आणण्यासाठी तो घराबाहेर पडला होता. यावेळी झालेल्या हवाई हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यु झाला.

या घटनेने भारतात चिंता व्यक्त करण्यात आली. अनेकांनी या घटनेचे केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. सरकारने लवकरात लवकर पाऊल उचलले नसल्याने आज युक्रेनमध्ये स्थित भारतीय विद्यार्थ्यांचे हे हाल झाल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले. तसेच भारतीय जनता विद्यार्थ्यांना युक्रेन मधून लवकरात लवकर बाहेर आणण्यासाठी मागणी करत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी नेते अमोल मिटकरी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले की, ‘युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी राजीनामा देण्याचे धाडस दाखवतील का ? की फक्त “मन की बात” मध्ये श्रद्धांजली वाहत बसतील?’

अमोल मिटकरी यांनी नरेंद्र मोदी यांना या घटनेसंदर्भात दोषी मानून, त्यांच्याकडे राजीनामा देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही या घटनेवर प्रतिक्रिया दिली होती. ‘युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात जीव गमावलेला भारतीय विद्यार्थी नवीन शेखरप्पा यास श्रद्धाजंली अर्पण करतो. अद्यापही रशियात हजारो आपले भारतीय विद्यार्थी अडकले असून ते प्रचंड तणावाखाली आहेत. काहींना जेवणही मिळेना झालं आहे.’ असे म्हणाले.

तसेच म्हणाले होते की, ‘केंद्र सरकार आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांना विनंती करतो की, त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यावं, युक्रेनमध्ये अकडलेल्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या कुटुंबियांची निराशा आणि काळजी समजून घ्यावी. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने आता गतिमान पाऊलं उचलावी.

राजकारण

Join WhatsApp

Join Now