सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. आपल्या आजूबाजूला अशा अनेक घटना घडत आहेत, ज्यामध्ये गुंड समाजात धाक निर्माण करून सामान्य लोकांना लुटण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका गुंडांच्या टोळीने काल रात्री तलवारी हातात घेऊन धुमाकूळ घातला आहे.
ही घटना औरंगाबाद येथील चंपा चौक परिसरात काल रात्री साडेदहा वाजता घडली आहे. खुनाच्या गुन्ह्यातून आठ दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या एका कुख्यात गुन्हेगाराने दोन ते तीन साथीदारांसह हातात तलवार घेऊन या ठिकाणी राडा घातला आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
जामिनावर सुटलेल्या कुख्यात गुंडाचे नाव अश्फाक पटेल असे आहे. त्याची नुकतीच आठ दिवसांपूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून सुटका झाली होती. त्याने शहरातील गजबजलेल्या चंपा चौकात गुरुवारी रात्री अचानकपणे राडा घालायला सुरूवात केली.
हातात तलवारी असलेल्या या टोळक्यानी तलवारी फिरवत रस्त्याने जाणाऱ्या वाहनांची तोडफोड सुरू केली. अचानकपणे सुरू झालेल्या हा राडा पाहून काही क्षणात दुकाने बंद झाली. तर काहींनी आपली दुकाने सोडून पळ काढला. त्यानंतर काही लोकांनी धाडस दाखवून पोलिसांना फोन द्वारे संबंधित घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती कळताच सिटी चौक आणि जिन्सी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून अश्फाकने तेथून पळ काढला. पोलिसांनी वेळत पोहोचत परिस्थिती नियंत्रणात आणली. यावेळी लोकांचा प्रचंड जमाव जमला होता. नेमकं काय होत आहे याचा अंदाज लोकांना लागत नव्हता.
मध्यंतरी कश्यप गँगचे अनुकरण करणाऱ्या गुंडगिरी टोळीने औरंगाबाद मध्ये दहशत माजवली होती. काही गुंड एका लग्नात नंग्या तलवारी घेऊन डान्स करताना आढळले होते. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणावर क्षुल्लक कारणासाठी तलवारी, चाकू आणि फायटरने गंभीर वार केले होते. या भागातील गुंडगिरी कधी संपेल याची सर्वसामान्य लोक वाट पाहत आहेत.