सध्या पाच राज्याच्या निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे. सर्वच पक्षांच्या प्रचार सभा सुरू झाल्या आहेत. उत्तर प्रदेश मध्ये अशीच एक भाजप आमदाराची प्रचार सभा होती. यावेळी चक्क भाजपच्या उमेदवाराने खुर्चीवर उभे राहून उठा बशा काढत, जनतेची माफी मागितली आहे. माफी मागतानाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सध्या चालू असणाऱ्या प्रचार सभेत वेगळेच रंग पाहायला मिळत आहेत. उत्तर प्रदेश मधील सोनभद्रमध्ये निवडणूक प्रचारादरम्यान आमदार आणि भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांचे वेगळेच रूप पाहायला मिळाले. प्रचारादरम्यानच भूपेश चौबे यांनी खुर्चीवर उभे राहून कान पकडून पाच वर्षात झालेल्या चुकांसाठी जनतेची माफी मागितली आहे.
भूपेश चौबे हे सोनभद्रच्या रॉबर्टसगंज मतदारसंघातून आमदार आहेत. भाजपने त्यांना पुन्हा एकदा तिकीट देऊन मैदानात उतरवले आहे. भूपेश चौबे यांनी झारखंडचे माजी आरोग्य मंत्री आणि आमदार भानू प्रताप शाही यांना आपल्या प्रचारासाठी बोलावले होते.
प्रचारासाठी स्टेज उभारून भाषणे सुरू होती. दरम्यान, भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांनी खुर्चीवर उभे राहून दोन्ही कान पकडून आपल्याकडून झालेल्या चुकांची माफी मागायला सुरुवात केली. त्यांना हे करताना पाहून अनेकांनी रोखण्याचा प्रयत्न केला.
यावेळी भूपेश चौबे म्हणाले की, 2017 च्या निवडणुकीत ज्या प्रकारे तुम्हा सर्व देवभक्त कार्यकर्त्यांनी मला आशीर्वाद दिला, त्याचप्रमाणे यावेळीही तुमचे आशीर्वाद द्या. जेणेकरून रॉबर्टसगंज विधानसभेत भारतीय जनता पक्षाचे कमळ फुलू शकेल. असे म्हणत त्यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या चुकांची माफी मागण्यास सुरुवात केली.
यूपी के सोनभद्र में चुनाव प्रचार के दौरान बीजेपी विधायक ने कान पकड़कर लगाई उठक-बैठक, पांच साल में हुई गलतियों के लिए माफी मांगी pic.twitter.com/XRIEKob4mm
— Hindustan (@Live_Hindustan) February 23, 2022
त्याचवेळी प्रमुख पाहुणे भानू प्रताप यांनी भाजप उमेदवाराच्या समर्थनार्थ मते मागताना सांगितले की, त्यांचा लढा सपा आणि बसपाशी नसून ओवेसी आणि काँग्रेससारख्या लोकांशी आहे. विधानसभा निवडणुकीच्या तीन टप्प्यात सपा-बसपा निम्मे झाले असून, सातव्या टप्प्यात येथून त्यांचा पूर्ण सफाया होणार आहे.
भानू प्रताप यांनी भाजपचे उमेदवार भूपेश चौबे यांच्या बद्दल सांगितले की, येथील बागेसोटी गावाला स्वातंत्र्यापासून रस्ता आणि पुलाची आकांक्षा होती, ती सदरचे आमदार भूपेश चौबे यांनी सोडवली. मिर्झापूर मंडळात सर्वाधिक काम भूपेश चौबे यांनी केले. भाजपच्या राजवटीत गुंड माफिया तुरुंगात आहेत. मोदी आणि योगींच्या नेतृत्वाखाली देशाचा आणि राज्याचा झालेला विकास पाहून विरोधकांची झोप उडाली आहे. अशा स्थितीत ते केवळ प्रचाराशिवाय दुसरे काही करू शकत नाहीत, असे म्हणाले.