टीव्ही आणि बॉलीवूड इंडस्ट्रीत सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. अनेक स्टार जोडप्यांनी लग्न करून आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली असून आता या यादीत लोकप्रिय मालिका ‘कसौटी जिंदगी की’ फेम अभिनेता सिझेन खानचे नावही लवकरच जोडले जाणार आहे.
वयाच्या 44 वर्षीय सिझेन खान अजूनही बॅचलर आहे आणि गेल्या तीन वर्षांपासून अफशीनला डेट करत आहे. आता सिझेनने त्याच्या आणि अफशीनच्या नात्याला एक पाऊल पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सिझेन आणि अफशीन लवकरच लग्नाच्या तयारीत आहेत. अभिनेत्याने याबाबत नुकत्याच एका मुलाखतीत खुलासा केला आहे.
सिझेनची मैत्रीण अफशीन ही मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिच्यासोबत सिझेन यावर्षी लग्न करण्याच्या तयारीत आहे. लग्नासाठी वय नसतं आणि त्याला लग्नाची घाई करायची नव्हती असं सिझेन खानचं मत आहे. त्यामुळे त्यानं लग्नासाठी भरपूर वेळ घेतला,आणि अखेर आता लग्नाच्या बेडीत अडकण्याचा निर्णय घेतला आहे.
सिझेन खानने त्याच्या लग्नाबद्दल मुलाखतीत सांगितले की, आम्ही तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहोत आणि आनंदी आहोत. कोरोना महामारी नसती तर आतापर्यंत आमचे लग्न झाले असते. पण आता आम्ही या वर्षाच्या अखेरीस लग्नाच्या गाठी बांधण्याचा विचार करत आहोत. असं असलं तरी मला असं वाटतं की लग्नासाठी कोणतेही परिपूर्ण वय नसतं.
एवढा वर्ष अविवाहित राहण्याबद्दल सिझेन खानला प्रश्न केल्यावर तो म्हणाला की, मला लग्नाची घाई करायची नव्हती. मी माझ्या कुटुंबासाठी अनुकूल आणि प्रामाणिक असलेल्या व्यक्तीच्या शोधात होतो. चांगले संस्कार असलेल्या व्यक्तीच्या शोधात होतो. माझ्या आयुष्यात येणारी अशी व्यक्ती असावी जी आमच्या नात्याचा आदर करेल आणि मग मी अफशीनला भेटलो. ती या सगळ्यात बसते.
सिझेन खानला तिची मैत्रीण अफशीनच्या हाताने बनवलेल्या बिर्याणीचे वेड आहे. एवढेच नाही तर हाताने बनवलेली बिर्याणी खाल्ल्यानंतरच त्याने अफशीनला प्रपोज केले. याआधीच्या एका मुलाखतीत सिझेन ने सांगितले होते की, तो जगभर फिरला आहे आणि सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले आहेत, परंतु फक्त अफसीनच्या हाताने बनवलेल्या बिर्याणीमुळे तो प्रभावित झाला. त्यानंतर त्याने अफसीनला लग्नासाठी प्रपोज केले होते.