Share

भेसळखोरांनी केली हद्द पार! शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन पिस्ता म्हणून विकला, शेकडो किलो माल जप्त

लोक पैसे कमवण्यासाठी काय शक्कल लढवतील सांगता येत नाही. अशीच एक घटना घडली असून, शेंगदाण्याला चक्क हिरवा रंग देवून त्याची पिस्ता म्ह्णून विक्री केली जात होती. याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनला समजताच त्यांनी या भेसळखोऱ्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शेंगदाण्याला आपण गरीबांचा बदाम म्हणतो. मात्र याच शेंगदाण्याला पिस्ता बनवून काही भेसळखोरांनी लुटीचा गोरखधंदा सुरू केला आहे. शेंगदाण्याला कृत्रिम रंग देऊन पिस्ता म्हणून त्याची रोजरोजपणे विक्री सुरू आहे. शेंगदाण्याला रंगवून, सुकवून पिस्ता बनवण्याचा हा प्रकार नागपुरात सुरू होता.

शेंगदाण्याला घातक रंगाने रंगवून, त्याला पिस्त्याचा आकार देऊन ती मिठायांमध्ये वापरण्याचा हा प्रकार गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु होता. यावर, अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा घालून इमारतीतून तब्बल 621 किलो रंगवलेला शेंगदाणा जप्त केला असून नागपुरातील कोणकोणते मिठाईवाले याचा वापर करत होते याचा तपास आता सुरु करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून शांतीनगर परिसरातील कावरापेठ येथे छापा टाकला. काशी शेंगदाणा चिप्स या नावाने असलेल्या दुकानातून शेंगदाण्याला रंग दिलेला माल जप्त करण्यात आला. हंसापुरी येथील आयुष फूड येथेही शेंगदाण्याची पिवळा रंग देऊन विक्री केली जात होती.

शेंगदाण्याला हिरव्या आणि लाल रंगात रंगवून, उन्हात अनेक दिवस सुकवून, चाळणीने स्वच्छ करून पिस्ता किंवा बदाम सारखे बनवले जाते. नंतर मशीनने त्याची कात्रण (चिप्स) करून 90 रु किलोच्या शेंगदाण्याची कात्रण बाजारात पंधराशे ते सतराशे रुपये किलोने पिस्ता किंवा बदामाची कात्रण म्हणून मिठाई उत्पादकांना विकली जात होती.

अन्नसुरक्षा कायद्यानुसार कोणत्या खाद्यपदार्थाला आणि कोणता रंग द्यायचा याचे नियम आहेत. खाद्यपदार्थात रंग वापरणे हा गुन्हा असून, अन्नसुरक्षा मानदे कायदा 2006नुसार उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईची आहे. एक लाखाचा दंड आणि कमीत कमी तीन महिने आणि जास्तीत जास्त तीन वर्षांचा कारावास होऊ शकतो. या घटनेतील जप्त मालाचे प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले असून न्यायालयीन खटल्यानंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

इतर

Join WhatsApp

Join Now