सध्या ‘गांधी’ हे नाव जेवढं राजकारणात चर्चेत आहे, तेवढेच क्रिकेटच्या क्षेत्रात देखील चर्चेत येत आहे. आयपीएल लिलावाच्या निमित्ताने या गांधी नावाची चर्चा वारंवार होत आहे. हा गांधी म्हणजे नेमकं कोण असा प्रश्न सर्वांना पडला असेल, तर या गांधींचे नाव किरणकुमार गांधी असून, तो दिल्ली कॅपिटल्सच्या लिलाव टीममधील एक इसम आहे. तो चर्चेत येण्याचे एक खास कारण आहे.
आयपीएलच्या लिलावावर सगळ्यांची नजर असते. क्रिकेटच्या मैदानात जेवढी रणनीती ठरवावी लागते, तेवढीच आयपीएलच्या संघात खेळाडूंची खरेदी करताना ठरवावी लागते. यामध्ये आपल्याला हवा तो खेळाडू कमी किंमतीत कसा मिळेल, यासाठी नेमकं काय करायचं, याचंही प्लानिंग करावं लागतं. आता ही गोष्ट अधिक प्रकर्षानं समोर येण्यामागचं कारण, म्हणजे किरण कुमार गांधी यांची लिलावावेळी करण्यात येणारी रणनीती होय.
आयपीएल हंगामा 2022 च्या मेगा लिलावात, एक संघ ज्याने आपली पर्स खूप लवकर खर्च केली. त्याचे नाव दिल्ली कॅपिटल्स आहे. आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी बेंगळुरू येथे आयोजित करण्यात आला होता. संपूर्ण लिलाव पाहिल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाचे खूप कौतुक केले जात आहे. या संघाने कमी किमतीत आपल्या संघात लिलावात सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश केला.
एवढेच नाही तर ज्या खेळाडूंना दिल्ली कॅपिटल्स संघात घ्यायचे नव्हते त्यांचीही मुद्दाम बोली लावून भाव वाढवत ठेवले. त्यामुळे इतर संघांना जास्त पैसे देऊन हे खेळाडू विकत घ्यावे लागले. या रणनीतीचा इतर संघांच्या बजेटवरही परिणाम झाला.
दिल्ली कॅपिटल्समध्ये सर्वोत्तम खेळाडूंना खरेदी करण्याच्या या डावपेचामागे किरणकुमार गांधी यांचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. गांधींच्या रणनीतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेक यूजर्स त्यांचे कौतुकही करत आहेत. तर काही जण त्यांचा निषेध करत आहेत. त्यांच्या रणनीतीवर अनेक मीम्स देखील तयार झाले आहेत.
दिल्ली कॅपिटल्सची मालकी GMR ग्रुप आणि JWS ग्रुप या दोन मोठ्या कंपन्यांकडे आहे. किरण कुमार गांधी हे GMR समूहाचे CEO, MD आणि संचालक आहेत. जवळजवळ प्रत्येक हंगामात, गांधी त्यांच्या संघाच्या वतीने लिलावात बोली लावतात, परंतु यावेळी त्यांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे.
गेल्या अनेक हंगामापासून, गांधी हे दिल्ली कॅपिटल्ससाठी एक चांगला संघ तयार करण्याचे काम करत आहेत आणि यावेळी त्यांनी ज्या पद्धतीने खेळाडूंची निवड केली आहे, त्यावरून ते त्यात यशस्वीही झाल्याचे दिसते. गांधी दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक आहेत आणि संघाचे व्यवस्थापन पाहतात. किरणने उस्मानिया विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
ट्विटरवर गांधी यांच्यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक त्याच्या बिझनेसमन माइंडची स्तुती करत आहेत, तर काही त्याची तुलना प्रीती झिंटाशी करत आहेत. गेल्या अनेक सीझनमध्ये प्रीती ज्या पद्धतीने बोली लावून खेळाडूंच्या किमती वाढवत असे, त्याच पद्धतीने गांधी करत असल्याचे युजर्सचे म्हणणे आहे, पण तरीही ट्विटर युजर्स प्रीतीला चांगले असल्याचे सांगत आहेत.






