महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत त्यागी महाराज आणि त्यांचे शिष्य यांचा जबलपूरजवळ एका भीषण रस्ता अपघातात मृत्यू झाला. ओव्हरटेक करणाऱ्या ट्रॉलीला संतांच्या स्कॉर्पिओ कारने धडक दिल्याने हा अपघात धनगवाजवळ घडला. त्यात संत आणि त्यांच्या शिष्याचा मृत्यू झाला, तर 4 जण जखमी झाले आहेत.
संत त्यागी महाराज हे नांदेड येथील आहेत. धुक्यांमुळे हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. जबलपूर येथे शुक्रवारी सकाळी हा अपघात झाला. यावेळी, त्यागी महाराज छत्तीसगडहून महाराष्ट्रात येत होते. यात त्यागी महाराज यांच्यासह दोघांचा मृत्यू झाला.
माहितीनुसार, त्यागी यांची गाडी भरवेगात होती. त्यावेळी, ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. सकाळी धुक्यामुळे चालकाला ट्रॉली दिसली नाही, शिवाय ट्रॉली चालकाने पार्किंग लाइट देखील लावली नव्हती. त्यावेळी त्याची स्कॉर्पिओ गाडी पुढे असणाऱ्या ट्रॉलीला जाऊन धडकली. अपघाताच्या वेळी संत त्यागी महाराज चालकाच्या शेजारी बसले होते.
सिहोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत त्यागी महाराज स्कॉर्पिओ क्रमांक एमएच 26 एके 7133 यातून येत होते. गाडीत चालकासह सात जण छत्तीसगडहून परतत होते. पहाटे 5.30 वाजता ते NH-30 च्या महागवान तिहारे येथे पोहोचले होते. त्याचवेळी एका वाहनाला ओव्हरटेक करत असताना त्यांचे वाहन ट्रॉलीला धडकले.
सिहोरा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत त्यागी महाराज हे 45 वर्षांचे होते. त्यांच्या मागे बसलेल्या बलराम नावाच्या तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. तर आणखी एक जण जखमी झाला आहे. दोन्ही मृतदेह पीएमसाठी पाठवून तपास सुरू करण्यात आला आहे.
प्रचंड धुके हेही अपघाताचे कारण असल्याचे बोलले जात आहे. सकाळी बऱ्यापैकी धुके होते. त्यामुळे ओव्हरटेक करताना ट्रॉली दिसत नव्हती. पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत. वाहनातील अन्य पाच जणांपैकी एक जण जखमी झाला असून चालकासह अन्य 4 जण पूर्णपणे सुरक्षित आहेत.