सध्या अजिंक्य रहाणे चांगलाच भडकलेला पाहायला मिळत आहे. मी काही महत्वाचे निर्णय घेतले आणि त्याचे परिणाम देखील चांगले दिसून आले. मात्र, माझ्या निर्णयांचे श्रेय दुसऱ्यानेच घेतले, असे म्हणत अजिंक्यने आपलं मौन सोडलं आहे. मात्र, त्याने असे वक्तव्य करण्यामागे नेमकं कारण काय याचा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
मागच्या काही काळापासून खराब फॉर्ममुळे सातत्याने अजिंक्यला टीकेचा सामना करावा लागत आहे. सध्या रहाणे अनेकांना खुपतोय. त्याच्या क्रिकेट करीयरबद्दल सातत्याने प्रश्न उपस्थित केले जातायत. मात्र, आता टीका करणाऱ्यांना अजिंक्यने चोख उत्तर दिलं आहे.
अजिंक्य रहाणेने अखेर ‘बॅकस्टेज विथ बोरीया’ या कार्यक्रमात त्याच्यावर करण्यात येत असलेल्या आरोपांवर अखेर मौन सोडलं आहे. करीयर संबंधीच्या तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल भाष्य त्यानं यावेळी केलं. बॉर्डर-गावस्कर मालिकेत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने संघाचं नेतृत्व केलं होतं.
याबाबत रहाणेने प्रथमच एक मोठं विधान केलं आहे.“माझ करीयर संपलं, असं लोक जेव्हा म्हणतात, तेव्हा मी फक्त हसतो. ज्यांना खेळ समजतो, ते असं बोलणार नाहीत. ऑस्ट्रेलिया आणि त्याआधी काय झालं? ते सगळ्यांना माहित आहे. खेळावर प्रेम करणारे विवेकाने बोलतील” असे म्हणाला.
“ऑस्ट्रेलियातील सीरीजमध्ये मी काय केलं, ते मला माहित आहे. दवंडी पिटून एखाद्या गोष्टीचं श्रेय घेण्याचा माझा स्वभाव नाही. काही निर्णय मी घेतले होते. पण दुसऱ्यानेच त्याचं श्रेय घेतलं. व्यक्तीगत श्रेयापेक्षा संघाचा विजय माझ्यासाठी महत्त्वाचा आहे” असं रहाणेनं सांगितलं. अजिंक्य रहाणेचा रोख नेमका कोणाकडे आहे, ते मात्र स्पष्ट झालेलं नाही.
ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या ऐतिहासिक टेस्ट सीरिज विजयाचा अजिंक्य रहाणे हिरो होता. मात्र, वर्षभरानं परिस्थिती बदलली आहे. खराब फॉर्ममुळे त्याच्याकडून उपकर्णधारपद काढून घेण्यात आले. विराट कोहलीनं कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर भावी कॅप्टनच्या शर्यतीमधून तो बाहेर आहे, इतकंच नाही तर त्याची टीममधील जागा देखील धोक्यात आहे.






