..त्यामुळे मी ऋषभ पंतला ओपनिंग करण्यासाठी पाठवलं, अखेर रोहित शर्माने केला खुलासा

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरा वनडे सामना खेळला जात आहे. टीम इंडिया प्रथम फलंदाजी करत आहे, विशेष म्हणजे या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत ऋषभ पंत सलामीला आला, या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सर्वत्र याची चर्चा होत असताना रोहितने याबाबत खुलासा केला आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या सलामीच्या जोडीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या,कारण पहिल्या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने ज्याच्यासोबत सलामी दिली होती त्या इशान किशनला दुसऱ्या सामन्यात वगळण्यात आले होते.

दुसऱ्या सामन्यासाठी आणि दुसऱ्या वनडेसाठी केएल राहुलचा प्लेइंग इलेवनमध्ये समावेश करण्यात आला. अशा परिस्थितीत आता रोहित शर्मासोबत कोण ओपनिंग करेल असा प्रश्न सर्वांच्या मनात होता. त्यातच रोहितने ऋषभ पंत सोबत सलामी दिली. हा बदल दुसरा सलामीवीर केएल राहुल संघात असताना करण्यात आला. ऋषभ पंतने 34 चेंडूत 18 धावा केल्या आणि बाद झाला. यामुळे लोकांना आश्चर्य वाटले.

या बदलाबाबत कर्णधार रोहित शर्माला सामना संपल्यानंतर विचारण्यात आलं. त्यावेळी रोहित म्हणाला, ‘मला काही वेगळ्या गोष्टी करण्यास सांगितल्या होत्या,आणि ही वेगळीच गोष्ट होती. ऋषभ पंतने सलामी देणं लोकांना आवडले असेल. पण हो हे कायमस्वरूपी नाही.’

तसेच म्हणाला, ‘शिखर धवन पुढच्या सामन्यात संघात परतेल. त्यालाही सामन्याचा सराव गरजेचा आहे. प्रत्येक वेळी निकाल महत्वाचा नसतो. आपण एका सामन्यात काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी वेगळं करताना एखादा सामना आम्ही गमावला तरी त्याची फारशी चिंता आम्ही करत नाही. आम्ही कोणते कॉम्बिनेशन चालू शकतील याची पडताळणी करत आहोत.’ असे रोहित म्हणाला.

ऋषभ पंतने यापूर्वी कधीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामी दिली नव्हती. 19 वर्षाखालील देशांतर्गत क्रिकेटमध्ये तो सलामी करताना दिसला असला तरी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ओपनिंग करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.